Islamabad Accord: ‘आम्ही दबावापुढे झुकणार नाही…’; इराणने फेटाळला 15-कलमी प्रस्ताव; पाकिस्तानच्या मध्यस्थीला दाखवली केराची टोपली

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने तयार केलेला मसुदा प्रस्ताव त्यांना प्राप्त झाला होता, मात्र तेहरानने तो नाकारला आहे.

Islamabad Accord: ‘आम्ही दबावापुढे झुकणार नाही…’; इराणने फेटाळला 15-कलमी प्रस्ताव; पाकिस्तानच्या मध्यस्थीला दाखवली केराची टोपली

Islamabad Accord: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष निवळण्यासाठी पाकिस्तानने अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत सादर केलेला 15-कलमी शांतता प्रस्ताव इराणने अधिकृतपणे फेटाळून लावला आहे. या प्रस्तावामुळे सोमवारी युद्धविराम लागू होण्याची आणि होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र इराणच्या या कठोर भूमिकेमुळे मध्य-पूर्वेतील शांततेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

मध्यस्थांमार्फत आलेला प्रस्ताव अमान्य
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानने तयार केलेला मसुदा प्रस्ताव त्यांना प्राप्त झाला होता, मात्र तेहरानने तो नाकारला आहे. "कोणत्याही शस्त्रसंधीबाबतच्या वाटाघाटी या इराणच्या राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊनच केल्या जातील. आम्ही आमची भूमिका आणि अटी मध्यस्थांमार्फत यापूर्वीच संबंधित पक्षांपर्यंत पोहोचवल्या आहेत," असे बघाई यांनी ठामपणे सांगितले.

'डेडलाईन' आणि युद्धाच्या धमक्यांना इराण जुमानणार नाही
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अल्पावधीत युद्धविराम न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना इराणने म्हटले आहे की, "कालमर्यादा (Deadlines) आणि युद्धाच्या धमक्या या वाटाघाटींच्या मूळ भावनेशी विसंगत आहेत. इराण कोणत्याही प्रकारच्या दबावापुढे किंवा धमक्यांपुढे झुकून तडजोड करणार नाही." इराणने आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या असून, त्याकडे तडजोड म्हणून न पाहता 'आत्मविश्वासाचे प्रतिबिंब' म्हणून पाहिले जावे, असेही त्यांनी नमूद केले.

काय होता पाकिस्तानचा 'इस्लामाबाद करार'?
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर यांनी रात्रभर राजनैतिक प्रयत्न करून हा प्रस्ताव तयार केला होता. यातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे होत्या:
45 दिवसांचा युद्धविराम: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील लष्करी कारवायांना तात्काळ विराम.
होर्मुझ सामुद्रधुनी: जागतिक तेल आणि वायू पुरवठा सुरळीत करण्यासाठी सामुद्रधुनी खुली करणे.
अण्वस्त्र आणि निर्बंध: इराणने अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न सोडणे आणि बदल्यात निर्बंधांतून सूट मिळवणे.
राजनैतिक संवाद: पाकिस्तान हा दोन्ही देशांमधील संवादाचा एकमेव मार्ग म्हणून काम करेल.

हेही वाचा – US Destroyed Own Planes : इराणमध्ये अमेरिकेवर नामुष्की! स्वतःचीच 100 दशलक्ष डॉलर्सची विमानं उडवली, कारण काय?

ऊर्जा बाजारपेठेत चिंतेचे वातावरण
इराणने हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे जागतिक तेल आणि वायू बाजारपेठेत पुन्हा एकदा अस्थिरतेचे सावट पसरले आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिल्याने इंधनाचे दर कडाडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणने अमेरिकेला देण्यासाठीचे आपले राजनैतिक उत्तर तयार ठेवले असून ते योग्य वेळी जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता अमेरिका यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number