Agnivesh Agrawal : वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या आयुष्यात सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. न्यूयॉर्कमध्ये स्कीइंग करताना झालेल्या अपघातात त्यांचा 49 वर्षीय मुलगा, अग्निवेश अग्रवाल याचे दुर्दैवी निधन झाले. या भीषण वैयक्तिक हानीनंतर अग्रवाल यांनी आपल्या संपत्तीच्या उद्दिष्टावर पुनर्विचार केला असून, आपल्या एकूण संपत्तीपैकी 75% वाटा समाजकार्यासाठी दान करण्याचा आपला जुना संकल्प पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे. मुलाच्या निधनानंतर हा निर्णय त्यांच्यासाठी केवळ एक वचन नसून मुलाच्या आठवणींना दिलेली एक भावनिक श्रद्धांजली आहे.
अग्निवेशच्या आठवणीत समाजसेवेचा संकल्प
अनिल अग्रवाल यांनी अत्यंत भावूक संदेशात म्हटले आहे की, मुलाला गमावणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता. मात्र, या प्रसंगामुळे संपत्तीचा खरा वापर आणि जबाबदारी काय असावी, याचे त्यांना नव्याने भान आले. अग्निवेशशी झालेल्या संभाषणांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, यश मिळवल्यानंतर त्याचा उपयोग समाजातील दुर्बल घटकांचे जीवन सुधारण्यासाठी व्हावा, असे अग्निवेशचेही विचार होते. त्यामुळेच साधेपणाने जगून राष्ट्राच्या उभारणीसाठी आपली संसाधने वापरण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
35 हजार कोटींची नेटवर्थ आणि दानाचा विस्तार
फोर्ब्सच्या 2026 मधील आकडेवारीनुसार, अनिल अग्रवाल यांची एकूण संपत्ती अंदाजे 4.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 35,000 कोटी रुपये आहे. त्यांच्या या संपत्तीचा मोठा स्रोत खाणकाम, धातू, वीज आणि तेल-वायू क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘वेदांता रिसोर्सेस’मधील त्यांची भागीदारी आहे. आपल्या आयुष्यातच जास्तीत जास्त संपत्ती परत देण्याच्या जागतिक तत्त्वज्ञानाशी ते सहमत असून, मुलाच्या अकाली निधनानंतर या प्रक्रियेला अधिक गती देण्याचे त्यांनी ठरवले आहे.
हेही वाचा – US India trade: ट्रम्प टॅरिफ धोरणाचा थेट परिणाम भारतावर; कोळंबी व वस्त्रोद्योग शेअर्समध्ये मोठी घसरण
शिक्षण आणि आरोग्यावर राहणार विशेष लक्ष
अग्रवाल यांच्या दानशूरतेचा मुख्य ओघ शिक्षण, आरोग्यसेवा, पोषण, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या पायाभूत क्षेत्रांकडे असणार आहे. गरिबीचे दुष्टचक्र तोडण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी ही क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांचे मत आहे. ही सर्व लोकोपयोगी कामे त्यांच्या कौटुंबिक फाउंडेशन आणि वेदांता समूहाशी जोडलेल्या विविध सेवाभावी व्यासपीठांद्वारे राबवली जातील. विशेषतः भारतातील दुर्गम आणि वंचित समुदायांपर्यंत मदत पोहोचवण्याचे त्यांचे ध्येय आहे.
Today is the darkest day of my life. My beloved son, Agnivesh, left us far too soon. He was just 49 years old, healthy, full of life, and dreams. Following a skiing accident in the US, he was recovering well in Mount Sinai Hospital, New York. We believed the worst was behind us.… pic.twitter.com/hDQEDNI262 — Anil Agarwal (@AnilAgarwal_Ved) January 7, 2026
व्यवसायापलीकडे सामाजिक बांधिलकीची ओढ
कॉर्पोरेट विश्वात अनिल अग्रवाल यांच्या या निर्णयाचे मोठे कौतुक होत आहे. संपत्ती म्हणजे केवळ व्यवसायातील यश नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे, या त्यांच्या विश्वासाचा हा पुनरुच्चार मानला जातो. वैयक्तिक दुःखाच्या काळात समाजाचे ऋण फेडण्याचे हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या मुलाच्या मूल्यांना जिवंत ठेवण्यासाठी आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी आपली संपत्ती कारणी लागावी, हीच त्यांची अंतरीची इच्छा आहे.