TTE Body Cameras: भारतीय रेल्वेने प्रवासी सेवा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासणी करणारे टीटीई (TTEs) केवळ गणवेशातच नव्हे, तर 'बॉडी कॅमेऱ्यांसह' (Body-worn Cameras) सज्ज दिसणार आहेत. तिकीट तपासणीदरम्यान होणारे वादविवाद रोखणे आणि रेल्वेतील पारदर्शकता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या नवीन प्रणालीमुळे कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर होणारे निराधार आरोप थांबतील आणि प्रवाशांच्या तक्रारींचेही पुराव्यासह निवारण करता येईल.
अत्याधुनिक फिचर्स आणि 20 तासांचा बॅटरी बॅकअप
रेल्वेने टीटीईंना दिलेले हे कॅमेरे आकाराने अतिशय लहान पण तंत्रज्ञानाने प्रगत आहेत. यामध्ये हाय-डेफिनिशन (HD) व्हिडिओ रेकॉर्डिंगसोबतच ऑडिओ रेकॉर्डिंग आणि रात्रीच्या वेळी स्पष्ट चित्र टिपण्यासाठी 'नाईट व्हिजन'ची सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कॅमेऱ्यांची बॅटरी सुमारे 20 तास टिकणारी आहे, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातही रेकॉर्डिंगमध्ये खंड पडणार नाही. हे कॅमेरे 'टॅम्पर-प्रूफ' असल्याने त्यातील डेटाशी छेडछाड करणे कोणालाही शक्य होणार नाही, ज्यामुळे तो एक ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल.
मुंबईसह प्रमुख विभागांत प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) काही निवडक रेल्वे विभागांमध्ये राबवण्यात येत आहे. यामध्ये मुंबई, वाल्टायर आणि रायपूर या विभागांचा समावेश आहे. येथील टीटीईंना कॅमेरा हाताळण्याचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या विभागांमधील निकाल आणि प्रतिसाद सकारात्मक आल्यास, भारतीय रेल्वे ही प्रणाली देशभर लागू करण्याच्या तयारीत आहे. या तंत्रज्ञानामुळे रेल्वे प्रवासात शिस्त येण्यास मोठी मदत होणार आहे.
हेही वाचा – RBI चा मोठा दणका! एकाच वेळी 150 NBFC कंपन्यांचे परवाने रद्द; ग्राहकांच्या कर्जाचे आणि FD चे काय होणार?
पारदर्शकता आणि वादांना पूर्णविराम
प्रवासात तिकीट तपासणी करताना अनेकदा प्रवाशांचे रेल्वे कर्मचाऱ्यांशी खटके उडतात. अनेकदा या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता निष्पक्ष चौकशी करणे कठीण होते. मात्र, आता प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात कैद होणार असल्याने गैरवर्तन करणाऱ्यांवर वचक बसेल. भारतीय रेल्वेने यापूर्वी ऑनलाइन तिकीट आणि एआय-आधारित सुरक्षा यंत्रणा अमलात आणली आहे, त्यात आता या 'स्मार्ट' तिकीट तपासणी प्रणालीची भर पडली असून, हे आधुनिक रेल्वेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.