Mumbai Crime : अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम लोपामुद्रा राऊत यांच्या मुंबईतील सांताक्रूझ येथील निवासस्थानातून सुमारे 76.39 लाख रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून बेड्या ठोकल्या आहेत. सांताक्रूझ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा सुगावा लावला. अटकेनंतर आरोपीकडून रोख रक्कम, सोन्याची बिस्किटे आणि महागड्या घड्याळांसह सुमारे 51 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
परगावी असण्याचा फायदा घेत साधला डाव; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
लोपामुद्रा राऊत या 20 जून ते 27 जुलै दरम्यान व्यावसायिक कामासाठी शहराबाहेर असताना आरोपीने ही चोरी केली. घर बंद असल्याचा फायदा घेऊन त्याने मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला. लोपामुद्रा परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली आणि त्यांनी तात्काळ सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
सौंदर्य स्पर्धेची विजेती असलेल्या लोपामुद्रा यांनी 'बिग बॉस' आणि 'खतरो के खिलाडी' या लोकप्रिय शोमधून ओळख मिळवली आहे. सध्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेल्या असतात. दरम्यान, या चोरीप्रकरणाचा पुढील तपास पोलीस वेगाने करत आहेत.