Crime News: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दिदाउली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नार्थो गावात एका लहान मुलाचे घरातून अपहरण करून त्याच्यावर क्रूर हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीला शोधण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांची त्याच्याशी चकमक झाली. या कारवाईत आरोपीच्या पायाला गोळी लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सुमारे 6:30 च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पीडित मुलगा आपल्या आईजवळ झोपला असताना अज्ञात व्यक्तीने त्याला घरातून घेऊन गेल्याचा आरोप आहे. काही वेळानंतर आईला मुलगा दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर गावालगतच्या जंगलात मुलगा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. प्राथमिक चौकशीत या प्रकरणामागे जुने वाद असल्याची शक्यता तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी शान हा संभल जिल्ह्यातील रहिवासी आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये पीडित मुलाच्या आईने त्याच्याविरोधात अत्याचार, मारहाण आणि SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीला न्यायालयातून जामीन मिळाला होता. तपासादरम्यान आरोपी आणि संबंधित महिलेमध्ये पूर्वीपासून ओळख असल्याचाही मुद्दा समोर आला असून, या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.
पीडित कुटुंबाच्या तक्रारीनंतर दिदाउली पोलीस आणि SWAT पथकाने आरोपीच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. शोधादरम्यान आरोपी पोलिसांच्या हाती लागताच चकमक झाली. या कारवाईत आरोपीच्या पायाला गोळी लागली आणि त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा – Nashik News : चांदवड-लासलगाव रोडवर फिल्मी स्टाईल पाठलाग; 32 किलो गांजासह स्विफ्ट कार जप्त, तिघांना अटक
दरम्यान, अमरोहाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) यांनी सांगितले की, या गुन्ह्यात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस विविध अंगांनी तपास करत असून, हा गुन्हा पूर्वनियोजित कटाचा भाग होता का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर विविध दावे केले जात असले, तरी अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.