OTP Fraud: ऑनलाइन बँकिंग आणि सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी बँका आणि दूरसंचार कंपन्यांनी आता कंबर कसली आहे. सध्याच्या 'वन-टाइम पासवर्ड' (OTP) प्रणालीला अधिक सुरक्षित करण्यासाठी 'सायलेंट ऑथेंटिकेशन' (Silent Authentication) नावाचे क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हेगारांनी तुमचा OTP चोरला, तरीही त्यांना तुमच्या बँक खात्यातून पैसे काढता येणार नाहीत.
काय आहे 'सायलेंट ऑथेंटिकेशन' तंत्रज्ञान?
बँकिंग व्यवहारांसाठी हे तंत्रज्ञान 'प्रमाणीकरणाचा अतिरिक्त थर' (Extra layer of authentication) म्हणून काम करेल. सध्या ऑनलाइन व्यवहारासाठी पासवर्ड आणि OTP ची आवश्यकता असते. मात्र, सायबर गुन्हेगार 'सिम स्वॅपिंग' किंवा 'कॉल फॉरवर्डिंग'सारख्या क्लृप्त्या वापरून लोकांचे OTP चोरतात आणि खाती रिकामी करतात. 'सायलेंट ऑथेंटिकेशन'मुळे केवळ OTP असून चालणार नाही, तर बँक पार्श्वभूमीवर (Background) काही तांत्रिक गोष्टींची पडताळणी करेल, ज्यामुळे हॅकर्सचा प्रवेश रोखला जाईल.
हे तंत्रज्ञान नेमके कसे काम करेल?
'ET Telecom' च्या अहवालानुसार, हे तंत्रज्ञान एखाद्या 'बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन' यंत्रणेप्रमाणे कार्य करेल. जेव्हा एखादा व्यवहार सुरू होईल, तेव्हा बँक रिअल-टाइममध्ये दूरसंचार कंपनीकडून (Telecom Operator) माहिती घेईल. यामध्ये खालील गोष्टींची तपासणी केली जाईल:
मोबाइल उपकरणाचा आयडी (Unique Device ID): व्यवहार ज्या मोबाइलवरून होत आहे, तो अधिकृत वापरकर्त्याचाच आहे का?
सिम कार्डची स्थिती: नोंदणीकृत सिम कार्ड सध्या सक्रिय (Active) आहे की नाही?
उपकरणाची ओळख: जर बँक खात्याशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक दुसऱ्याच उपकरणावर वापरला जात असेल, तर बँक तो व्यवहार तात्काळ 'ब्लॉक' करेल.
हेही वाचा – Income Tax Website: आता CA कडे जाण्याची गरज नाही! आयकर विभागाने लाँच केले 'हे' खास AI पोर्टल
सायबर गुन्हेगारांना बसणार चाप
या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, बाह्य स्तरावर हॅकर्सना याची कल्पनाही येणार नाही की त्यांचा व्यवहार बँक रोखत आहे. सिम स्वॅपिंग करून नवीन सिमवर OTP मिळवणाऱ्या गुन्हेगारांची डाळ आता शिजणार नाही, कारण मूळ उपकरण सक्रिय नसल्याचे बँकेला लगेच समजेल. सध्या हे तंत्रज्ञान चाचणीच्या टप्प्यात असून, दूरसंचार विभाग आणि बँका यावर वेगाने काम करत आहेत. यामुळे भविष्यात ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहेत.