Arjun Tendulkar: क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे; एक म्हणजे त्याचे आगामी लग्न आणि दुसरे म्हणजे विजय हजारे ट्रॉफीमधील त्याची कामगिरी. अनेक सामन्यांच्या प्रतिक्षेनंतर अर्जुनने या हंगामातील आपली पहिली विकेट मिळवण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, त्याने ज्या फलंदाजाला बाद केले, त्या पृथ्वी शॉची एकेकाळी सचिन तेंडुलकरशी तुलना केली जात होती.
पृथ्वी शॉला बाद करून उघडले खाते
विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये तो सातत्याने गोलंदाजी करत होता, परंतु त्याला एकही विकेट मिळत नव्हती. गुरुवारी महाराष्ट्राविरुद्ध गोलंदाजीला आल्यावर त्याने सलामीवीर पृथ्वी शॉला बाद करून आपले खाते उघडले. पृथ्वीने 5 चेंडूत केवळ 1 धाव काढली. पृथ्वी आणि अर्जुन हे मैदानाबाहेर चांगले मित्र मानले जातात, मात्र मैदानात अर्जुनने बाजी मारली. अर्जुनने या सामन्यात एकूण 8 षटके टाकली, 39 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली.
अर्जुन मार्चमध्ये बोहल्यावर चढणार
अर्जुनची या हंगामातील आतापर्यंतची कामगिरी संमिश्र राहिली आहे. गोलंदाजीसोबतच तो फलंदाजीतही संघर्ष करताना दिसत आहे. या स्पर्धेत त्याचा सर्वोच्च स्कोअर 24 धावा असून, तो त्याने आपल्या जुन्या संघाविरुद्ध म्हणजेच मुंबईविरुद्ध केला होता. दरम्यान, अर्जुनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोठी अपडेट समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अर्जुन मार्च 2026 च्या सुरुवातीला विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मार्चच्या शेवटी आयपीएल (IPL) सुरू होण्यापूर्वी हा विवाह सोहळा पार पडू शकतो. यावर्षीच्या आयपीएलमध्ये अर्जुन LSG (लखनऊ सुपर जायंट्स) संघाकडून खेळताना दिसणार आहे.