T20 World Cup 2026: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाची घोषणा कधी होणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या प्रेस रिलीजनुसार, टीम इंडियाची घोषणा 20 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. याच दिवशी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी घरच्या व्हाईट-बॉल मालिकेसाठीही भारतीय संघाची निवड केली जाईल. खेळाडूंची नावे दुपारी 1:30 वाजता जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषद घेणार आहेत.
आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंका येथे आयोजित केला जाणार आहे. हा बहुप्रतिक्षित सामना 7 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 8 मार्चपर्यंत खेळवला जाईल. गतविजेती असलेल्या भारतीय संघाकडे या स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपदाची प्रबळ दावेदारी मानली जात आहे. भारताने 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेला टी-20 विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता.
दरम्यान, टी-20 विश्वचषकाच्या तयारीचा भाग म्हणून न्यूझीलंड संघ जानेवारी 2026 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये एकूण 8 सामन्यांची व्हाईट-बॉल मालिका खेळवली जाईल. या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी वडोदरा येथे, दुसरा 14 जानेवारी रोजी राजकोट येथे, तर तिसरा आणि शेवटचा सामना 18 जानेवारी रोजी इंदूर येथे खेळवला जाईल. त्यानंतर 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल.
हेही वाचा – IND vs SA 5th Match : दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यापूर्वी संजू सॅमसनकडे अखेरची संधी; बुमराहबाबत काय माहिती?
याशिवाय, पहिला टी-20 सामना 21 जानेवारी रोजी नागपूरमध्ये, दुसरा 23 जानेवारी रोजी रायपूरमध्ये, तिसरा 25 जानेवारी रोजी गुवाहाटीत, चौथा 28 जानेवारी रोजी विशाखापट्टणम (विझाग) येथे आणि शेवटचा टी-20 सामना 31 जानेवारी रोजी तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाईल. टी-20 विश्वचषकापूर्वी होणारी ही न्यूझीलंडविरुद्धची मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची मानली जात असून, संघ संयोजन आणि खेळाडूंची अंतिम चाचणी म्हणून या सामन्यांकडे पाहिले जाणार आहे.