Suryakumar Yadav Post: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी युके दौऱ्यासाठी टी-20 संघाची घोषणा करताना स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला संघातून थेट डच्चू दिला. आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातून सूर्यकुमारला अचानक वगळले जाईल आणि त्याचे कर्णधारपदही हिरावून घेतले जाईल, अशी कल्पना क्रिकेट जगतात कोणीही केली नव्हती. त्याच्या जागी गेल्या 3 वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना न खेळलेल्या श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. या धक्कादायक निर्णयानंतर सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"पुढील आव्हानांसाठी या प्रतिभावान संघाला शुभेच्छा!"
2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादवने भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व स्वीकारले होते. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात टीम इंडियाने द्विपक्षीय मालिकांमध्ये आपले वर्चस्व राखले, तसेच आशिया कप आणि टी-20 विश्वचषक 2026 या दोन्ही मोठ्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले. मात्र, कर्णधार म्हणून उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही गेल्या काही काळातील त्याची खराब फलंदाजी आणि आयपीएल 2026 मधील सुमार कामगिरी यामुळे तो निवडकर्त्यांच्या निशाण्यावर आला. अखेर फॉर्म गमावल्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. संघात स्थान न मिळाल्यानंतर सूर्यकुमारने भारतीय संघाचा एक फोटो शेअर केला आणि "पुढील आव्हानांसाठी या प्रतिभावान संघाला शुभेच्छा" (Wishing this talented squad all the best for the challenges ahead) असे 11 शब्दांचे कॅप्शन लिहीत तिरंग्याचा इमोजी पोस्ट केला आहे.
नवीन कर्णधार श्रेयस अय्यरसमोर असणार मोठे आव्हान
दुसरीकडे, भारतीय टी-20 संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी पुढील प्रवास सोपा असणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अय्यरला आयपीएलमध्ये 3 वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करण्याचा आणि 100 हून अधिक सामन्यांचा दांडगा अनुभव आहे. श्रेयस आपल्या या नव्या इनिंगची सुरुवात आगामी आयर्लंड दौऱ्यापासून करेल. मात्र, त्याचा खरा कस 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत लागणार आहे. माजी कर्णधार सूर्यकुमारने निर्माण केलेले यशाचे निकष पार पाडत संघाला पुढे नेण्याचे मोठे आव्हान आता अय्यरसमोर असेल.