Income Tax Notice to E-rickshaw Driver: उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका सामान्य ई-रिक्षा चालकाच्या आयुष्यात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. 15 वर्षांपासून दिल्लीत ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रामपाल गंझाखेडा यांना चक्क 38.5 कोटी रुपयांच्या व्यवहारांसाठी आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीला ही नोटीस बजावण्यात आली आहे, त्याला ती वाचताही येत नाही. त्यांची पत्नी दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते, तर गावात केवळ 1 बिघा जमीन आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधींचे व्यवहार झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण गाव थक्क झाले आहे.
चोरी गेलेल्या मोबाईलचा असा झाला गैरवापर
ही धक्कादायक घटना अत्रौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंझाखेडा गावात उघडकीस आली आहे. रामपाल यांनी वकिलामार्फत या प्रकरणाची चौकशी केली असता, त्यांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आले. 3 वर्षांपूर्वी रामपाल यांच्या आईचे निधन झाले होते, त्यावेळी दिल्लीत असताना त्यांच्या कानावरून मोबाईल हिसकावण्यात आला होता. त्या मोबाईलमध्ये रामपाल यांच्या पॅन आणि आधार कार्डचे फोटो होते. सायबर गुन्हेगारांनी याच माहितीचा आधार घेत बनावट खाते उघडले आणि त्यातून कोट्यवधींची उलाढाल केली.
दोन वर्षांत 38.5 कोटींचे व्यवहार
जेव्हा पोस्टमनने रामपाल यांना आयकर विभागाचे पत्र दिले, तेव्हा त्यांना काहीच समजले नाही. उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने तपासणी केली असता, रामपाल यांच्या पॅन कार्डचा वापर करून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 7.5 कोटी आणि 2024-25 मध्ये तब्बल 31 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. एकूण 38.5 कोटी रुपयांच्या या व्यवहारांसाठी आयकर विवरणपत्र (ITR) दाखल न केल्यामुळे विभागाने ही नोटीस बजावली आहे. रामपाल आणि त्यांच्या पत्नीला या व्यवहारांची पुसटशी कल्पनाही नव्हती.
हेही वाचा – Beed Santosh Deshmukh Case : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी येणार जेलबाहेर; नेमकं कारण काय?
न्यायासाठी ई-रिक्षा चालकाची धावपळ
रामपाल गेल्या 15 वर्षांपासून आपली पत्नी रामलालीसोबत दिल्लीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहतात. त्यांच्याकडे केवळ 1 एकर जमीन असून त्यावर ते शेती करतात. सायबर चोरीच्या या जाळ्यात अडकल्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब आता दहशतीखाली आहे. आधार आणि पॅन कार्डसारख्या गोपनीय कागदपत्रांचे फोटो मोबाईलमध्ये ठेवणे किती महागात पडू शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. सध्या रामपाल या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनाकडे दाद मागत आहेत.