Bhandup Ganja Farming : सिमेंटच्या जंगलात ड्रग्जची तस्करी आपण ऐकली आहे, पण मुंबईत चक्क अमली पदार्थांची शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भांडूपच्या दुर्गम डोंगराळ भागात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांनी पद्धतशीरपणे गांजाची लागवड केली होती. या शेतीसाठी चक्क महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीतून पाणी चोरण्यात येत असल्याचे पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
नगरसेविकेच्या धाडसी मोहिमेमुळे बिंग फुटले
भांडूप (पश्चिम) येथील जमील नगर, वॉटर टँक परिसरात समाजकंटकांचा वावर वाढल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक करत होते. या पार्श्वभूमीवर, स्थानिक माजी नगरसेविका जागृती पाटील यांनी परिसरात पाहणी केली असता, दाट झाडीच्या आडोशाला गांजाची शेकडो झाडे डोलताना दिसली. हा संपूर्ण भूखंड मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा असून, त्याचा ताबा अमली पदार्थ माफियांनी घेतल्याचे समोर आले आहे.
पालिकेच्या पाईपलाईनमधून पाणी
या गांजाच्या शेतीला पाणी घालण्यासाठी आरोपींनी कल्पक पण बेकायदेशीर मार्ग निवडला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला भगदाड पाडून पाणी चोरले जात होते. छोट्या पाटाद्वारे हे पाणी थेट गांजाच्या झाडांपर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. डोंगराळ भागाचा आणि नैसर्गिक झाडीचा फायदा घेत ही शेती इतकी लपवून केली होती की, बाहेरून कोणालाही याचा संशय येत नव्हता.
पोलिसांची मोहीम
घटनेची माहिती मिळताच भांडूप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अमली पदार्थांच्या बाजारात लाखो रुपयांची किंमत असणारी ही सर्व झाडे पोलिसांनी मुळासकट उपटून जप्त केली आहेत. डोंगराच्या कुशीत चालणाऱ्या या अवैध व्यवसायामुळे स्थानिक महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता, जो आता या कारवाईमुळे काहीसा मार्गी लागला आहे. ‘हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक जमिनीवर अमली पदार्थांची शेती होणे चिंताजनक आहे. या प्रकरणामागे केवळ गर्दुल्ले आहेत की एखादी मोठी टोळी काम करत आहे, याचा सखोल तपास सुरू आहे,’ अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या कारवाईनंतर आता मुंबईतील इतर डोंगराळ भागांतही अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत का? याची चाचपणी पोलीस यंत्रणा करत आहे.