Pune Crime: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून महिलांच्या सुरक्षेबाबत एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीला सतत अश्लील मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या एका उच्चपदस्थ तरुणाला चांगलाच चोप देण्यात आला आहे. पुण्यातल्या कात्रज भागात ही घटना घडली असून, आरोपी तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बहुजन न्याय पॅंथर संघटनेचा दणका
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा एका ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीच्या कार्यालयात ‘HR’ (मानव संसाधन व्यवस्थापक) म्हणून कार्यरत होता. तो आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तिथल्याच एका तरुणीला वारंवार अश्लील आणि त्रासदायक मेसेज पाठवत होता. या त्रासाला कंटाळून अखेर मदतीची हाक देण्यात आली. त्यानंतर ‘बहुजन न्याय पॅंथर’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालय गाठले आणि पीडित तरुणीची छेड काढणाऱ्या या नराधमाला सर्वांसमोर चांगलाच धडा शिकवला.
कात्रज परिसरातील व्हिडिओ व्हायरल
ही संपूर्ण घटना कात्रज येथील कार्यालयात घडली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला त्याच्याच केबिनमध्ये गाठून विचारपूस केली आणि त्यानंतर त्याला चांगलाच चोप दिला. “मुलींना कामाच्या ठिकाणी त्रास देणे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा यावेळी देण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ बाहेर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर संबंधित तरुणाची कंपनीतील प्रतिमा मलिन झाली असून, अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.