Epstein Files Scam: सध्या इंटरनेटवर “एपस्टाईन फाइल्स” (Epstein Files) हा शब्द प्रचंड ट्रेंड होत असून त्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी नेटकऱ्यांची मोठी गर्दी गुगलवर पाहायला मिळत आहे. मात्र, तुमची हीच उत्सुकता सायबर गुन्हेगारांसाठी आयती संधी ठरत आहे. या विषयाशी संबंधित माहिती शोधताना एका चुकीच्या क्लिकमुळे तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक खाते धोक्यात येऊ शकते, असा गंभीर इशारा सरकारने आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी दिला आहे.
ट्रेंडिंग विषय ठरतोय सायबर ट्रॅप
जेव्हा युझर्स एपस्टाईन फाइल्सशी संबंधित कागदपत्रे किंवा बातम्या गुगलवर शोधतात, तेव्हा त्यांना अनेक आकर्षक वेबसाइट्सच्या लिंक्स दिसतात. या वेबसाइट्स दिसायला अधिकृत किंवा विश्वासार्ह माध्यमांसारख्याच असतात. मात्र, प्रत्यक्षात यातील अनेक साइट्स बनावट असून त्या केवळ वापरकर्त्यांना जाळ्यात ओढण्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. अशा फसव्या लिंक्सवर क्लिक केल्यास तुमच्या डिव्हाइसमध्ये मालवेअर शिरण्याची शक्यता असते.
लॉगिनचा आग्रह आणि माहितीची चोरी
या बनावट वेबसाइट्सवर अनेकदा असा दावा केला जातो की, संपूर्ण फाईल पाहण्यासाठी युझरला त्यांच्या Gmail आयडीने लॉगिन करावे लागेल. जसे एखादा वापरकर्ता आपला ईमेल आणि पासवर्ड तिथे एंटर करतो, तशी त्याची सर्व गोपनीय माहिती थेट हॅकर्सच्या हाती लागते. एकदा ईमेलचा ॲक्सेस मिळाला की, गुन्हेगार तुमचे कॉन्टॅक्ट्स, खाजगी मेसेज, बँकिंग तपशील आणि इतर संवेदनशील डेटा चोरून ब्लॅकमेलिंग किंवा आर्थिक फसवणूक करू शकतात.
स्वतःचा बचाव कसा करावा? तज्ज्ञांचा सल्ला
इंटरनेटवरील या धोक्यांपासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
URL तपासा: कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी वेबसाइटची URL नीट तपासा. संशयास्पद वाटणाऱ्या लिंकपासून दूर राहा.
अनोळखी लॉगिन टाळा: कोणत्याही अज्ञात वेबसाइटवर तुमचा Gmail किंवा सोशल मीडिया पासवर्ड वापरून ‘साइन इन’ करू नका.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA): तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांना 2FA सुरक्षा कवच द्या. यामुळे तुमचा पासवर्ड लीक झाला तरी हॅकर्सना तुमचे खाते उघडता येणार नाही.
मजबूत पासवर्ड: अंदाज लावता येणार नाही असे कठीण पासवर्ड ठेवा आणि ते नियमितपणे बदला.
Kya aap “Epstein Files” search karne ka soch rahe hain? Iss trending topic ke naam par phishing aur data theft scams chal rahe hain. Log curiosity mein Google par search karte hain aur fake links par jaakar apni Gmail ID se login kar dete hain#ScamAlert #EpsteinFiles pic.twitter.com/OFtXnkM6aj — CyberDost I4C (@Cyberdost) February 22, 2026
ऑनलाइन जगात प्रत्येक ट्रेंडिंग लिंक विश्वासार्ह नसते. केवळ उत्सुकतेपोटी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. त्यामुळे, सतर्क राहा आणि सुरक्षित रहा.