SBI YONO App Block Scam : तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल आणि व्यवहारांसाठी ‘योनो’ (YONO) अॅप वापरत असाल, तर सावधान! सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर एक धक्कादायक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. “तुमचे आधार कार्ड अपडेट केले नाही, तर तुमचे SBI YONO अॅप ब्लॉक केले जाईल,” असा दावा या मेसेजमध्ये केला जात आहे. मात्र, सरकारने या मेसेजची दखल घेत ग्राहकांना सतर्क केले आहे. हा मेसेज पूर्णपणे बनावट असून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा सायबर गुन्हेगारांचा नवा सापळा आहे.
व्हायरल मेसेजमधील धक्कादायक दावा
या व्हायरल मेसेजमध्ये ग्राहकांना घाबरवण्यासाठी ‘बँकिंग सेवांवर परिणाम होईल’ असे लिहिले जाते. मेसेजसोबत एक ‘APK’ फाइल डाउनलोड करण्याची लिंक पाठवली जाते. ग्राहकांना सांगण्यात येते की, आधार अपडेट करण्यासाठी ही फाइल इंस्टॉल करणे अनिवार्य आहे. प्रत्यक्षात, ही लिंक कोणत्याही अधिकृत बँकिंग प्रक्रियेशी संबंधित नसून ती हॅकर्सने तयार केलेली एक धोकादायक लिंक आहे. या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या फोनमधील खासगी माहिती धोक्यात येऊ शकते.
PIB Fact Check आणि बँकेचा खुलासा
केंद्र सरकारच्या अधिकृत फॅक्ट-चेक एजन्सी, PIB Fact Check ने या दाव्याची पडताळणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना अशा प्रकारचे कोणतेही मेसेज पाठवत नाही. SBI ने देखील आपल्या अधिकृत हँडलवरून ग्राहकांना इशारा दिला आहे की, बँक कधीही आधार अपडेट करण्यासाठी थर्ड-पार्टी लिंक किंवा ‘APK’ फाइल डाउनलोड करण्यास सांगत नाही. “क्लिक करण्यापूर्वी विचार करा,” असे आवाहन बँकेने ग्राहकांना केले आहे.
Is it true that your SBI YONO app will be blocked if you don’t update your Aadhaar❓ A message circulating on social media in the name of SBI claims that users must download and install an APK file to update their Aadhaar. It further claims that if Aadhaar is not updated, the… pic.twitter.com/KIWuMiLfCe — PIB Fact Check (@PIBFactCheck) March 22, 2026
‘APK’ फाइल का आहे इतकी घातक?
सायबर तज्ज्ञांच्या मते, APK फाइल्स या अँड्रॉइड अॅपच्या इन्स्टॉलेशन फाइल्स असतात. जेव्हा तुम्ही प्ले स्टोअरच्या बाहेरून एखाद्या अनोळखी लिंकद्वारे अशी फाइल डाउनलोड करता, तेव्हा तुमच्या फोनमध्ये ‘मालवेअर’ (Malware) किंवा ‘स्पायवेअर’ (Spyware) प्रवेश करू शकतात. हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनचा पूर्ण ताबा हॅकर्सला देऊ शकतात. यामुळे तुमचे OTP, बँकिंग पासवर्ड आणि वैयक्तिक डेटा चोरीला जाऊ शकतो, ज्याद्वारे तुमचे बँक खाते क्षणात रिकामे होऊ शकते.
सुरक्षित राहण्यासाठी काय करावे?
– अनोळखी लिंकवर क्लिक करू नका: व्हॉट्सअॅप किंवा मेसेजवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.
– केवळ अधिकृत अॅप वापरा: कोणतेही अॅप केवळ ‘Google Play Store’ किंवा ‘Apple App Store’ वरूनच डाउनलोड करा.
– बँकेशी संपर्क साधा: जर तुम्हाला तुमच्या खात्याबद्दल किंवा अॅपबद्दल शंका असेल, तर थेट बँकेच्या शाखेत जाऊन किंवा अधिकृत कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधा.
– गोपनीयता पाळा: तुमचा PIN, OTP किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.