Rahul Gandhi PA fraud man Arrested : काँग्रेस पक्षात मोठे पद मिळवून देण्याचे किंवा निवडणुकीचे तिकीट देण्याचे आमिष दाखवून देशभरातील नेत्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत भामट्याला देहरादून पोलिसांनी अटक केली आहे. गौरव कुमार असे या 42 वर्षीय भामट्याचे नाव असून तो मूळचा अमृतसरचा आहे, त्याने स्वतःला राहुल गांधींचा स्वीय सहाय्यक (PA) असल्याचे भासवून अनेक राज्यांतील नेत्यांना लाखो रुपयांना लुटले. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर काँग्रेसच्या राजकीय स्थितीचा फायदा घेत या भामट्याने आपला जाळे पसरवले होते. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भावना पांडे यांची 25 लाखांची फसवणूक
या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा उत्तराखंडमधील काँग्रेस नेत्या भावना पांडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर झाला. आरोपी गौरव कुमारने त्यांना फोन करून आपले नाव 'किनिष्क सिंह' असल्याचे सांगितले आणि पक्षात वरचे पद मिळवून देण्याच्या बदल्यात 25 लाख रुपयांची मागणी केली. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने काही वरिष्ठ नेत्यांच्या आवाजाची नक्कल करून भावना पांडे यांना ऐकवली होती. 13 एप्रिल रोजी या भामट्याने भावना पांडे यांच्या जखन येथील राहत्या घरी आपल्या सहकाऱ्याला पाठवून ही रोख रक्कम स्वीकारली आणि त्यानंतर तो गायब झाला.
बनावट 'ट्रू कॉलर' आयडीचा वापर
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपीने 2003 ते 2015 या काळात राहुल गांधींचे खरे पीए असलेल्या किनिष्क सिंह यांच्या नावाचा गैरवापर केला होता. त्याने किनिष्क सिंह यांच्या नावाने बनावट ट्रू कॉलर आयडी तयार केला होता, ज्यामुळे नेत्यांना फोन आल्यावर तो राहुल गांधींच्या कार्यालयातूनच असल्याचे वाटायचे. गुगलच्या मदतीने संबंधित नेत्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची माहिती गोळा करून तो त्यांना जाळ्यात ओढत असे. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून त्याचा हा काळा धंदा सुरू असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.
हेही वाचा – Rahul Gandhi: निवडणूक नव्हे ही तर 'मतांची चोरी'! राहुल गांधींचा भाजपवर आरोप; म्हणाले, 'हरियाणात तर…'
देशभरात फसवणुकीचे जाळे
गौरव कुमारने केवळ उत्तराखंडमध्येच नव्हे, तर गोवा, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्येही आपला हात साफ केला होता. 2017 मध्ये त्याने जयपूर येथील दोन नेत्यांकडून निवडणूक तिकिटाच्या नावाखाली 1 कोटी 90 लाख आणि 12 लाख रुपये उकळले होते. तसेच, 2025 मध्ये पाटणा येथे एका कार्यकर्त्याला पक्षात पद देतो म्हणून 3 लाख रुपयांना लुटल्याचे त्याने कबूल केले आहे. या टोळीने विविध राज्यांमध्ये काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली असल्याचे तपासात दिसत आहे.
पोलिसांची मोठी कारवाई
भावना पांडे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास चक्रावली. गौरव कुमार जेव्हा जखन परिसरातील पॅसिफिक मॉलजवळ पुन्हा एका नेत्याकडून रोख रक्कम घेण्यासाठी आला होता, तेव्हा पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्या संपर्कात उत्तराखंडमधील अनेक बडे नेते होते, ज्यांना तो जाळ्यात ओढण्याच्या तयारीत होता. या अटकेमुळे अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
राजकीय नेत्यांना सावध राहण्याचे आवाहन
काँग्रेस नेते हरीष रावत, हरक सिंह आणि यशपाल आर्या यांसारख्या मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून हा भामटा फसवणूक करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी अत्यंत हुशार असून नेत्यांना घोळात घेण्यात त्याचा हातखंडा होता. राजकीय नेत्यांनी अशा कोणत्याही अनोळखी फोनवर विश्वास ठेवू नये आणि आर्थिक व्यवहार टाळावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर सहकाऱ्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत.
हेही वाचा – Crime News: बंगालमध्ये विजयानंतर रक्ताचा सडा; भाजप आमदाराच्या भावाला निर्घृणपणे संपवलं, कोलकात्यात तणाव