PM Modi Death Threat: पुढील आठवड्यात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 9 जुलै 2026 रोजी मेलबर्न येथील मार्व्हल स्टेडियमवर 'मेलबर्न मीट्स मोदी' या विशेष सामुदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी फेसबुकवर करण्यात आलेल्या एका पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या गंभीर प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी (AFP) तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
धमकीचे स्वरूप आणि आयपी (IP) ॲड्रेसची ओळख
'द ऑस्ट्रेलिया टुडे'च्या वृत्तानुसार, ही धमकी अबू मुस्तफा नावाच्या एका फेसबुक अकाऊंटवरून देण्यात आली होती. या कमेंटमध्ये, "कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छत बंद ठेवले पाहिजे, अन्यथा पंतप्रधानाला ऑस्ट्रेलियात आपल्या मृत्यूला सामोरे जावे लागेल," असा आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. ही बाब समोर येताच ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांना याची माहिती देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांनी या संशयास्पद पोस्टचा आयपी (IP) ॲड्रेस शोधून काढला असून, यामागे एखादा मोठा गुन्हा करण्याचा कट रचला जात आहे का, याचा कसून शोध घेतला जात आहे.
सुरक्षा यंत्रणांचे कडेकोट नियोजन; अद्याप कोणालाही अटक नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अधिकृत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठका आणि जाहीर कार्यक्रमांचा समावेश आहे. विदेशी राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेचा विषय असल्याने ऑस्ट्रेलियन प्रशासन ही धमकी अत्यंत गांभीर्याने घेत आहे. या दौऱ्याच्या सुरक्षा नियोजनात ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस, स्थानिक राज्य पोलीस आणि विशेष सुरक्षा पथकांचा समावेश करण्यात आला आहे. फेडरल पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या धमकीबाबत अवगत करण्यात आले असून तपास वेगाने सुरू आहे.