Pandharpur Crime: सोशल मीडियाच्या आभासी जगात हजारो फॉलोअर्स मिळवणाऱ्या एका रीलस्टार महिलेचा वास्तव जीवनात मात्र अत्यंत दुर्दैवी अंत झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध रीलस्टार सोनाली जाधव हिला तिच्याच प्रियकराने गळा आवळून संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी सोनालीचा वाढदिवस होता, त्याच दिवशी तिचा मृत्यूचा सापळा रचण्यात आला.
आनंदाचा दिवस ठरला शेवटचा
सोनाली जाधव ही आपल्या रील्समुळे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होती. विवाहित असूनही काही कारणास्तव ती माहेरी राहत होती. याच काळात तिचे गावातीलच तुकाराम गावांधरे याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी खास होईल, अशी अपेक्षा असतानाच घात झाला.
हत्येमागचे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम हा सोनालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच त्यांच्यात सोन्याच्या दागिन्यांवरूनही वाद सुरू होते. वाढदिवसाच्या दिवशी “तुला दागिने देतो” असे आमिष दाखवून त्याने तिला बोलावून घेतले. तिथे पुन्हा वादाची ठिणगी पडली आणि रागाच्या भरात तुकारामने तिचा गळा आवळून जीव घेतला.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात फेकला
सोनालीला संपवल्यानंतर कुणाला संशय येऊ नये म्हणून तुकारामने सोनालीचा मृतदेह जवळच असलेल्या कालव्यात फेकून दिला. सोनाली बेपत्ता झाल्याने तिची शोधमोहीम सुरू होती, मात्र कालव्यात तिचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरुवातीला हा अपघात किंवा घातपात वाटत असताना पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि संशयाची सुई तुकारामकडे वळली.
हेही वाचा – Amravati Crime News : लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट, अयान-उझेरमध्ये मुली पटवण्यावरून शर्यत, पण अखेर….
अनैतिक संबंध रक्तरंजित शेवट
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. अनैतिक संबंध आणि संशयाच्या जाळ्यातून एका रीलस्टारचा असा अंत झाल्याने पंढरपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.