LPG Gas Cylinder: पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट भारतीय स्वयंपाकघरांना बसू लागला आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे एलपीजी (LPG) पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या महिनाभरापासून नवीन गॅस कनेक्शन देणे तात्पुरते बंद केले आहे. नवीन कनेक्शन मिळण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट तारीख समोर आलेली नाही.
आयातीवर अवलंबित्व ठरले अडथळा
भारताला दरवर्षी सुमारे 3.3 कोटी टन एलपीजीची गरज भासते, ज्यापैकी 65 टक्के गॅस आपण परदेशातून, विशेषतः पश्चिम आशियाई देशांतून आयात करतो. इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज' (होर्मुजची खाडी) या महत्त्वाच्या सागरी मार्गावर जहाजांची ये-जा विस्कळीत झाली आहे. सप्लाय चेनमध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे भारतात गॅसची टंचाई जाणवू लागली आहे.
जुन्या ग्राहकांना प्राधान्य
तेल कंपन्यांच्या सूत्रांनुसार, सध्या उपलब्ध असलेला गॅस साठा हा आधीच कनेक्शन असलेल्या नियमित ग्राहकांसाठी राखून ठेवला जात आहे. सध्याच्या ग्राहकांना विनाअडथळा सिलिंडर पुरवणे हे कंपन्यांचे पहिले प्राधान्य आहे. याच कारणामुळे नवीन घरात शिफ्ट होणारे किंवा ग्रामीण भागातील नवीन अर्जदार यांना कनेक्शनसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आकडेवारी काय सांगते?
2025-26 मध्ये वार्षिक वापर 33.21 दशलक्ष टनांवर होता, मात्र फेब्रुवारीत सुरू झालेल्या युद्धामुळे मार्च महिन्यात गॅसच्या वापरामध्ये मोठी घट नोंदवण्यात आली आहे. पुरवठा साखळीत पारदर्शकता राहावी यासाठी 94 टक्के सिलिंडरची डिलिव्हरी सध्या 'ऑथेंटिकेशन कोड'च्या (DAC) माध्यमातून केली जात आहे.
हेही वाचा – Luggage Lost Helpline: रेल्वे प्रवासात बॅग हरवली आहे?; घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने पुन्हा मिळवा तुमची बॅग
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले की, पश्चिम आशियातील संकट असूनही प्रभावी व्यवस्थापनामुळे पेट्रोल, डिझेल आणि पीएनजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात सरकारला यश आले आहे. दरम्यान, जोपर्यंत पश्चिम आशियातील तणाव कमी होत नाही, तोपर्यंत गॅस पुरवठ्यावरील हा दबाव कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सरकार सातत्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.