Crime News: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधील डोईवाला परिसरात एका नवविवाहित सरकारी शिक्षिकेच्या संशयास्पद मृत्यूने प्रचंड खळबळ उडाली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये विवाहबद्ध झालेल्या सृष्टी कंडारी हिने लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांतच आपले जीवन संपवले. जीवन संपवण्यापूर्वी तिने रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओमध्ये, “आई, मला माफ कर, मी अशी सोडून जात आहे; पण आता हे अत्याचार सहन होत नाहीत,” अशी आर्त हाक मारली होती. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करून तपास चक्रावली फिरवली आहे.
'अशुभ' ठरवून मानसिक आणि शारीरिक छळ
सृष्टीचा विवाह हर्रावाला येथील सरकारी कर्मचारी सौरभ खत्री याच्याशी झाला होता. मृत तरुणीची आई सीमा कंडारी यांच्या तक्रारीनुसार, लग्नानंतर काही दिवसांतच हुंड्यासाठी तसेच विविध कारणांवरून सृष्टीचा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर तिच्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. एका पुजाऱ्याच्या सांगण्यावरून सासरच्या लोकांनी सृष्टीला 'अशुभ' मानण्यास सुरुवात केली आणि घरातील प्रत्येक वाईट घटनेसाठी तिलाच दोषी ठरवले गेले. घटनेच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे तिच्यावरील मानसिक दबाव टोकाला पोहोचला होता.
कुटुंबीयांना न कळविल्याने संशय बळावला
सृष्टीशी 28 आणि 29 जुलै रोजी संपर्क न झाल्याने तिच्या माहेरच्या लोकांनी एका परिचित व्यक्तीला तिच्या घरी पाठवले. त्यावेळी तिची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात आले. मात्र, कुटुंबीय डेहराडूनला पोहोचले असता त्यांना मुलीच्या मृत्यूची धक्कादायक बातमी मिळाली. सासरच्यांनी या घटनेची साधी पूर्वकल्पनाही दिली नाही, असा आरोप करत, "ही आत्महत्या होती तर तत्काळ का कळवले नाही?" असा सवाल तिच्या आईने उपस्थित केला आहे.
पती, सासू व नणंदेविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी डोईवाला पोलीस ठाण्यात मृत तरुणीचा पती सौरभ रतुरी, सासू परविना देवी आणि नणंद चारू यांच्याविरोधात 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम 80(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डेहराडूनच्या सीओ वंदना यांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी करून पोलीस निष्पक्ष चौकशी करत आहेत. तपासात निष्पन्न होणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कठोर कारवाई केली जाईल.