Raja Raghuvanshi Case: सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका; जामीन रद्द, 3 आठवड्यांत शरणागतीचे आदेश

सोनम रघुवंशीला उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात मेघालय सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती.

Raja Raghuvanshi Case: सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका; जामीन रद्द, 3 आठवड्यांत शरणागतीचे आदेश

Raja Raghuvanshi Case:  इंदूर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या मेघालयमधील हनिमूनदरम्यान झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा नाकारत तिचा जामीन रद्द केला आहे. न्यायालयाने तिला पुढील 3 आठवड्यांच्या आत संबंधित प्राधिकरणासमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, खटल्याच्या सुनावणीत विलंब झाल्यास 6 महिन्यांनंतर त्यांना पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मेघालय सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

सोनम रघुवंशीला उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात मेघालय सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली होती. राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपीने स्वेच्छेने शरणागती पत्करल्याचा दावा केला असला तरी दोषारोपपत्रातील नोंदी त्यास दुजोरा देत नाहीत. तसेच, कागदपत्रांमधील कायदेशीर कलमाच्या क्रमांकातील टंकलेखनाची चूक ही केवळ तांत्रिक त्रुटी असून, अशा कारणावर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा जामीन कायम ठेवणे योग्य ठरणार नाही. आरोपी फरार होण्याची शक्यताही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

बचाव पक्षाचा युक्तिवाद; निर्दोष असल्याचा दावा

दुसरीकडे, सोनम रघुवंशी यांच्या वकिलांनी जामिनाचे समर्थन करताना न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात एकूण 94 साक्षीदार असून आतापर्यंत केवळ 4 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. पूरक दोषारोपपत्रही दाखल झाले असून, गाझीपूर (उत्तर प्रदेश) येथून अटक झाल्यानंतर सोनम यांनी जामिनाच्या सर्व अटींचे काटेकोर पालन केले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या लेखी उत्तरात सोनम यांनी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगत हा खटला केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असून, आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा केला.

हेही वाचा – Crime News : धक्कादायक! पत्नीला विष देऊन पतीनेही संपवलं जीवन; सासऱ्यासोबतच्या अनैतिक संबंधांच्या संशयाने एकाच वेळी घरातील चार जणांचे मृत्यू

सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सोनम रघुवंशी यांच्यासमोर स्वतःहून शरण जाणे किंवा जामीन रद्द होण्यास सामोरे जाणे, असे दोन पर्याय ठेवले होते. अखेरीस जामीन रद्द करताना न्यायालयाने बदलत्या सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, आजची पिढी माहितीच्या बाबतीत समृद्ध असली तरी मानसिक तणाव हाताळण्याच्या बाबतीत अधिक संवेदनशील होत आहे. याच संदर्भात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि न्यायमूर्ती वराळे यांनीही नमूद केले की, आजकाल सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या माहितीलाच अनेकजण ज्ञान समजण्याची चूक करत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number