Fake Currency Racket: कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यासाठी शॉर्टकट शोधणाऱ्या एका तरुणाने चक्क घरातच बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातच्या राजकोटमध्ये उघडकीस आला आहे. राजकोट शहर विशेष कृती दलाने (SOG) राय्याधार भागात छापा टाकून नैतिक अग्रवत नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीने या बनावट नोटा बाजारात मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करत 38 बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले आहे.
गोशाळे शेजारील खोलीत नोटांची छपाई
SOG पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राय्याधार भागातील एका गोशाळे शेजारी असलेल्या खोलीवर छापा टाकण्यात आला. या झडतीदरम्यान पोलिसांना एक प्रिंटर-कम-स्कॅनर, कटर, पेन्सिली आणि कोरे कागद यांसह 100 आणि 200 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा सापडल्या. जप्त केलेल्या नोटांवर एकच अनुक्रमांक (सीरियल नंबर) असल्याचे आढळून आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने केवळ एका आठवड्यापूर्वीच YouTube वरील व्हिडिओ पाहून नोटा कशा छापायच्या याचे तंत्र शिकले होते.
दोन नोटा चलनात आणल्या अन् जाळ्यात अडकला
प्राथमिक चौकशीत आरोपीने कबुली दिली की, कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे त्याने हा मार्ग निवडला होता. तीन दिवसांपूर्वी त्याने प्रायोगिक तत्त्वावर 100 रुपयांच्या दोन बनावट नोटा छापून त्या बाजारात यशस्वीरित्या चलनात आणल्या होत्या. या यशाने प्रोत्साहित होऊन त्याने मोठ्या प्रमाणावर छपाई सुरू केली, मात्र पुढील नोटा चलनात येण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीवर यापूर्वी अपहरण आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.