Anmol Bishnoi Arrest: देशातील सर्वात कुख्यात गँगस्टर नेटवर्कपैकी एक मानल्या जाणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गटाविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ला मोठे यश मिळाले आहे. त्याचा धाकटा भाऊ आणि महत्त्वाचा साथीदार अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच एनआयएने त्याला ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटकेनंतर अनमोलला थेट पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे.
एनआयएच्या माहितीनुसार अनमोल बिश्नोई 2022 पासून कायद्यापासून पळ काढत होता आणि अमेरिकेत आश्रय घेत होता. संस्थेने 2023 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याला प्रमुख संशयितांपैकी एक म्हणून नमूद केले होते. त्याच्या अटकेनंतर तो लॉरेन्स बिश्नोईच्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये सहभागी असल्याचे सिद्ध झालेल्या 19 व्या आरोपींच्या यादीत सामील झाला आहे. तपासात असे आढळले आहे की 2020 ते 2023 या काळात अनमोलने गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांना देशातील अनेक हिंसक आणि दहशतवादी घटनांमध्ये आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवली. परदेशातून संपूर्ण नेटवर्क चालवण्यात, पैशांचे व्यवस्थापन आणि टोळीतील सदस्यांपर्यंत संसाधने पोहोचवण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
एनसीपी नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार
अनमोल बिश्नोई हा केवळ गुन्हेगारी टोळीचा भाग नाही तर अनेक मोठ्या हत्याकांडांमध्ये त्याचे थेट संबंध दिसून आले आहेत. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याला एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील ‘मुख्य मास्टरमाइंड’ म्हटले आहे. संपूर्ण षड्यंत्र रचणे, शूटरची निवड, शस्त्रास्त्रांची व्यवस्था यामागे अनमोलचा मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिद्धू मूसेवाला प्रकरणातही महत्त्वाचा दुवा
पंजाब पोलिसही अनमोलचा ताबा मागणार आहेत कारण सिद्धू मूसेवाला हत्याकांडात त्याची भूमिका तपासात समोर आली होती. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये त्याच्यावर खून, खंडणी, प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे अशा 20 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.
सलमान खानच्या घरावर झालेल्या फायरिंगमध्येही संशयित
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी झालेलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी अनमोलचा शोध अधिक तीव्र केला होता. त्याचप्रमाणे अनेक महिन्यांपासून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर वॉण्टेड यादीत होता. अनमोल उर्फ ‘भानू’ हा पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील दुतारावली गावचा रहिवासी असून, देशातील सर्वात धोकादायक गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईचा तो सख्खा भाऊ आहे. एनआयएच्या कारवाईनंतर बिश्नोई गटाचे अनेक रहस्ये लवकरच उघडकीस येण्याची शक्यता तपास अधिकारी व्यक्त करत आहेत.