Asha Bhosle Death: लतादीदी ‘विंची’ तर आशाताई ‘मायकलॅन्जलो’; राज ठाकरेंनी भावूक पोस्टद्वारे वाहिली आशा भोसलेंना श्रद्धांजली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत आशा ताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

Asha Bhosle Death: लतादीदी ‘विंची’ तर आशाताई ‘मायकलॅन्जलो’; राज ठाकरेंनी भावूक पोस्टद्वारे वाहिली आशा भोसलेंना श्रद्धांजली

Asha Bhosle Death: भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाने सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत आशा ताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आशाताई – द लास्ट एम्परर’ असे शीर्षक देत त्यांनी आशा भोसले यांच्या जाण्याने भारताच्या ‘रेनेसाँस’ (प्रबोधन) युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी आशा ताईंच्या गाण्यातील मानवी पैलू आणि त्यांच्या अफाट संघर्षाचा या पोस्टमध्ये प्रकर्षाने उल्लेख केला आहे.

लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलोशी तुलना
राज ठाकरे यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांची तुलना जागतिक कीर्तीचे कलाकार लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो यांच्याशी केली आहे. त्यांच्या मते, जर लतादीदींच्या गाण्यात विंचीसारखे ‘परफेक्शन’ आणि आध्यात्मिक अनुभूती होती, तर आशा ताईंच्या गाण्यात मायकलॅन्जलोच्या शिल्पांसारखी नजाकत, आवेग, लडिवाळपणा आणि बंडखोरी होती. आशा ताईंचे गाणे म्हणजे केवळ ‘पॅशन’ नसून, वयाच्या 15 व्या वर्षापासून स्वतःला आणि कुटुंबाला उभे करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा होता, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

वैयक्तिक आयुष्यातील वादळे आणि आवाजातील धिटाई
राज ठाकरे यांनी आशा ताईंच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षावर प्रकाश टाकताना म्हटले की, त्यांनी आयुष्यात अफाट त्रास सहन केला, पण तो कधीही आपल्या गाण्यातील कडवटपणा बनू दिला नाही. उलट, आयुष्यात आलेल्या धिटाईचे प्रतिबिंब त्यांच्या आवाजात उमटले. ‘पिया तू अब तो आजा’ मधील बेधडकपणा असो, ‘आईये मेहरबान’ मधील लडिवाळपणा असो किंवा ‘दम मारो दम’ मधील बंडखोरी, आशा ताईंनी प्रत्येक चौकटी मोडून काढल्या. त्यांनी दुःखाला कधीही हत्यार बनवले नाही, म्हणूनच त्या नेहमी खूप ‘मानवी’ वाटत राहिल्या.

हेही वाचा – Asha Bhosle Passed Away : भारतीय संगीत क्षेत्रातील दैदीप्यमान तारा निखळला; 20 भाषांत 11,000 हून अधिक गाणी, ‘गिनीज बुक’मध्ये नाव

भारतीय संगीत विश्वातील एका युगाचा अंत
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये या दोन्ही भगिनींच्या सहवासाला आपले भाग्य मानले आहे. त्यांनी म्हटले की, जर लतादीदी आणि आशाताईंसारख्या कलाकारांनी आपल्या भावविश्वाला व्यापले नसते, तर या देशात कधीच अराजक आले असते. युरोपातील रेनेसाँस युगाला जसा विंची आणि मायकलॅन्जलो यांनी आकार दिला, तसाच आकार या दोन बहिणींनी भारतीय चित्रपट संगीताला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशा ताईंच्या जाण्याने त्या सुवर्णयुगाचा शेवटचा मापदंड हरपला असल्याची भावना व्यक्त करत राज ठाकरे यांनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number