Kolkata Cyber Fraud : कोलकाता येथील अश्विनीनगर भागात राहणाऱ्या एका 74 वर्षीय निवृत्त ONGC कर्मचाऱ्याची सायबर गुन्हेगारांनी तब्बल 99 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. गौतम कुमार राय असे या पीडित व्यक्तीचे नाव असून, त्यांना सलग 4 दिवस 'डिजिटल बंधक' (Digital Arrest) बनवून ठेवण्यात आले होते. आरोपींनी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून राय यांची आयुष्यभराची पुंजी लंपास केली. याप्रकरणी बिधाननगर सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अटकेची भीती आणि मानसिक छळ
या फसवणुकीची सुरुवात 29 नोव्हेंबर रोजी व्हॉट्सॲप मेसेज आणि फोन कॉलने झाली. जाणून घेऊ, गुन्हेगारांनी रचलेला बनाव आणि पीडित व्यक्तीवर कसा निर्माण केला दबाव..
– खोटा आरोप : राय यांच्या नावावर असलेल्या एका सिम कार्डचा वापर प्रतिबंधित संघटना 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) शी संबंधित लोक खंडणी मागण्यासाठी करत आहेत, असा दावा करण्यात आला.
– डिजिटल पाळत : तपासाच्या नावाखाली राय यांना दररोज अनेक तास, तर कधी सलग 7 तास व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले गेले.
– धमकी : जर या प्रकरणाची माहिती कुटुंबाला दिली किंवा घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण कुटुंबाला अटक करून मुंबईत नेले जाईल आणि तिथे त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा होईल, अशी भीती घातली गेली.
– बँक खात्यांची चौकशी : RBI कडून तुमच्या खात्यांची चौकशी सुरू असून, तुमचे पैसे 'सुरक्षित' ठेवण्यासाठी ते सरकारी खात्यात वर्ग करावे लागतील, असे भासवण्यात आले.
हेही वाचा – Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात अडकली महिला; घर आणि भूखंड विकून भामट्यांना केली 2 कोटींची भर
99 लाखांचा व्यवहार आणि फसवणूक
अत्यंत मानसिक दडपणाखाली असलेल्या राय यांनी आरोपींच्या सूचनांनुसार आपल्या दोन मुदत ठेवी (FD) वेळेपूर्वीच मोडीत काढल्या. 1 डिसेंबर रोजी त्यांनी बँकेत जाऊन RTGS च्या माध्यमातून एकूण 99 लाख रुपये गुन्हेगारांनी सांगितलेल्या एका चालू खात्यात हस्तांतरित केले. हे पैसे 3 दिवसांत पुन्हा त्यांच्या मूळ खात्यात परत जमा होतील, असे आश्वासन चोरांनी दिले होते. मात्र, दिलेल्या मुदतीत पैसे परत आले नाहीत आणि ज्या क्रमांकावरून फोन येत होते ते सर्व बंद झाले, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे राय यांच्या लक्षात आले.
पोलीस तपास आणि तांत्रिक विश्लेषण
बिधाननगर पोलिसांनी याप्रकरणी फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि निधीचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. चोरीला गेलेल्या पैशांचा माग काढण्यासाठी पोलीस आता त्या संशयास्पद बँक खात्यांचे तपशील तपासत असून ते गोठवण्याची (Freeze) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेले बनावट दस्तऐवज, कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सॲप संदेशांचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा – New Cyber Fraud: फोन उचलला पण समोरून शांतता…; Silent Calls म्हणजे सायबर स्कॅमर्सचा नवीन डाव?