Gurugram Woman Biker Hit and Run: देशभरातून तीव्र संताप व्यक्त झालेल्या गुरुग्राम येथील महिला रायडर अपघात प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. शिवानी चौहान ऊर्फ सिया या महिला रायडरच्या दुचाकीला कारने जाणीवपूर्वक धडक देऊन पसार झालेल्या कल्याण बैंसला या मुख्य आरोपीला पोलिसांनी राजस्थानमधील दौसा येथून बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी सकाळी ही थरारक घटना घडल्यापासून आरोपी फरार होता. पोलिसांनी त्याच्यासोबत लवनीश नावाच्या त्याच्या मित्रालाही ताब्यात घेतले असून, या गुन्ह्यात त्याची काय भूमिका होती याचा शोध घेतला जात आहे.
गोल्फ कोर्स रोडवर घडला थरार
हरियाणातील गुरुग्राम येथील प्रसिद्ध गोल्फ कोर्स रोडवर रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली होती. शिवानी चौहान ही तरुणी तिच्या इतर रायडर मित्रांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना आरोपी कल्याण बैंसला याने आपल्या कारने तिचा पाठलाग सुरू केला. कारमधील व्यक्ती नशेत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवानीने त्यांना सुरक्षित अंतर ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, संतापलेल्या कारचालकाने वाहनाचा वेग वाढवून तिच्या दुचाकीला बाजूने जोरदार धडक दिली.
घटनाक्रमातील महत्त्वाचे मुद्दे आणि तपासाची स्थिती
धडक लागल्यानंतर शिवानी दुचाकीवरून खाली कोसळली आणि रस्त्यावर काही मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. सुदैवाने या भीषण अपघातात ती थोडक्यात बचावली असून तिला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
पोलिसांनी पीडित महिला रायडरचा जबाब नोंदवून घेतला असून तिची न्यायालयीन साक्ष नोंदवण्यासाठी तिला न्यायालयात उपस्थित केले आहे.
सुरुवातीचा गुन्हा आणि वाढवलेले खुनाच्या प्रयत्नाचे कलम
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाईचा बडगा उगारला आहे. व्हिडिओमध्ये आरोपी जाणीवपूर्वक दुचाकीला उडवताना स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी सुरुवातीला लावण्यात आलेल्या निष्काळजीपणाच्या कलमांमध्ये वाढ करून थेट खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीचा दावा आणि पोलीस तपास
दरम्यान, अटकेत असलेल्या कल्याण बैंसला याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यू-टर्न घेताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असून, ही धडक हेतुपुरस्सर दिली नव्हती, असा दावा त्याने केला आहे. तसेच दुचाकी चालवणारी व्यक्ती महिला आहे याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती, असेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. सध्या गुरुग्राम पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.
हेही वाचा – Pune Firing : पुण्यात नक्की चाललंय काय? पुन्हा तरुणांकडून गोळीबार; पोलिसांकडून 6 जणांना अटक