India vs Ireland T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धची वन-डे मालिका संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आयर्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच आयर्लंडमधील बेलफास्ट शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, भारत-आयर्लंड टी-20 (T20) मालिकेच्या आयोजनावर संकट आले आहे. 26 आणि 28 जून 2026 रोजी बेलफास्ट येथे हे दोन सामने खेळवले जाणार आहेत. परंतु, तेथील बिघडलेल्या परिस्थितीमुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांची चिंता कमालीची वाढली आहे.
चाकू हल्ल्यानंतर उसळला हिंसाचार; बेलफास्ट हादरले
बेलफास्टमध्ये काही दिवसांपूर्वी एका चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हीडिओनंतर स्थानिक नागरिकांमध्ये स्थलांतरित (इमिग्रंट) समुदायाविरोधात तीव्र संताप उसळला आणि त्याचे रूपांतर हिंसक निदर्शनांमध्ये झाले. मुखवटे घातलेल्या आंदोलकांनी रस्त्यावरील अनेक वाहने पेटवून दिली, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांना लक्ष्य केले तसेच सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या वाढत्या हिंसेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण असून सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी BCCI हाय अलर्टवर
या हिंसक घडामोडी समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पूर्णपणे सतर्क झाले आहे. भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी सध्या बेलफास्टमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून ते सातत्याने 'क्रिकेट आयर्लंड'च्या संपर्कात आहेत. जर सामन्यापूर्वी तेथील वातावरण शांत झाले नाही, तर सामने बेलफास्टवरून इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा पर्यायही चर्चिला जात आहे, मात्र याचा अंतिम निर्णय क्रिकेट आयर्लंडच्या विनंतीनंतरच घेतला जाईल.
हेही वाचा – IND vs PAK Live Streaming: टीम इंडिया पाकिस्तानशी भिडणार; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा सामना ?
स्थानिक स्पर्धांवर टांगती तलवार आणि क्रिकेट आयर्लंडचा अल्टिमेटम
बेलफास्टमधील या तणावाचा फटका स्थानिक क्रिकेट स्पर्धांनाही बसताना दिसत आहे. क्रिकेट आयर्लंडने स्थानिक प्रशासन आणि प्रांतीय क्रिकेट संघटनांशी तातडीने संपर्क साधला आहे. 14 जूनपासून सुरू होणाऱ्या 'आयरिश सीनियर कप' आणि 'नॅशनल कप' स्पर्धांचे सामने खेळवायचे की नाही, याबाबत पुढील 48 तासांत मोठा निर्णय घेतला जाणार आहे. खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याने या 48 तासांच्या आढाव्यानंतरच भारत-आयर्लंड मालिकेची पुढील दिशा स्पष्ट होईल.
मालिका रद्द होणार की ठिकाण बदलणार?
सध्याच्या घडीला भारत-आयर्लंड टी-20 मालिका अधिकृतपणे रद्द करण्यात आलेली नाही. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी धोका कायम असल्याचा अहवाल दिला, तर सामने दुसऱ्या शहरात स्थलांतरित केले जाऊ शकतात आणि अत्यंत टोकाच्या परिस्थितीत वेळापत्रक बदलण्याचा किंवा मालिका रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड समन्वय राखून असल्याने, पुढील काही दिवसांत बेलफास्टमध्ये शांतता प्रस्थापित झाल्यास नियोजित वेळापत्रकानुसारच चाहत्यांना या मालिकेचा आनंद घेता येईल.