India Buys Russian Crude Oil : पश्चिम आशियातील युद्धाचा भडका उडाला असताना आणि होर्मूझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) विस्कळीत झाली असताना भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, भारताने रशियाकडून पुढील महिन्याच्या वितरणासाठी सुमारे 6 कोटी बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. आखाती देशांतील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर मोठा दबाव असताना भारताने आपली ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा मोठा व्यवहार केला आहे.
पुरवठा साखळीतील अडथळे आणि रशियाचे पुनरागमन
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेच्या दबावामुळे भारतीय रिफायनर्सनी रशियन तेलापासून अंतर राखले होते, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. सौदी अरब आणि इराककडून येणारी तेलाची जहाजे पर्शियन खाडीत अडकल्याने मंगलोर रिफायनरी (MRPL) आणि हिंदुस्थान मित्तल एनर्जी लिमिटेड यांसारख्या कंपन्या पुन्हा एकदा रशियन बाजाराकडे वळल्या आहेत. रशियाकडून खरेदी केलेली ही 6 कोटी बॅरलची मात्रा या महिन्यातील खरेदीच्या जवळपास असून, फेब्रुवारीच्या तुलनेत ती दुप्पट आहे. रशियालाही या व्यवहारातून मोठा फायदा झाला असून, मार्च 2022 नंतर रशियाला कच्च्या तेलातून मिळणारा महसूल सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
अमेरिकन सवलतीचा भारताला फायदा
रशियाकडून ही तेल खरेदी करणे अमेरिकेने दिलेल्या विशेष सवलतीमुळे शक्य झाले आहे. ज्या रशियन तेलाच्या खेपा 5 मार्चपूर्वी जहाजांवर चढवण्यात आल्या होत्या, त्या स्वीकारण्यास अमेरिकेने परवानगी दिली आहे. नंतर ही सवलत वाढवून 12 मार्चपूर्वी समुद्रात असलेल्या शिपमेंट्सनाही यात समाविष्ट करण्यात आले. जोपर्यंत होर्मूझ मार्गावरील अडथळे कायम राहतील, तोपर्यंत ही सवलत लागू राहील, अशी अपेक्षा भारतीय अधिकाऱ्यांना आहे. यामुळे ब्रेंट क्रूडच्या तुलनेत प्रति बॅरल 5 ते 15 डॉलरचा प्रीमियम देऊनही भारताने आपली गरज पूर्ण केली आहे.
पर्यायी मार्ग आणि व्हेंझुएलाकडून आयात
केवळ रशियावर अवलंबून न राहता भारत आपल्या पुरवठा साखळीत विविधता आणत आहे. एप्रिल महिन्यात व्हेंझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात 8 दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो ऑक्टोबर 2020 नंतरचा उच्चांक असेल. यामुळे कोणत्याही एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर किंवा सागरी मार्गावर अवलंबून राहण्याची जोखीम कमी होणार आहे. युद्धजन्य परिस्थितीतही भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार 'मल्टी-सोर्सिंग' धोरणाचा प्रभावी वापर करत आहे.
भारतीय बंदरांवर जहाजांची वर्दळ कायम
जागतिक अस्थिरता असूनही भारताच्या बंदरांवर इंधनाची जहाजे सुरक्षितपणे पोहोचत आहेत. 22 मार्च रोजी रशियन तेलाने भरलेले 'एमटी अॅक्वा टायटन' (MT Aqua Titan) हे जहाज मंगलोर किनारपट्टीवर पोहोचले. तसेच, टेक्सासून आलेले LPG चे जहाजही न्यू मंगलोर बंदरात दाखल झाले आहे. शिपिंग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही भारतीय बंदरावर गर्दी नाही आणि पर्शियन खाडीतील सर्व 22 भारतीय जहाजे आणि 611 खलाशी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
प्रशासकीय दिलासा आणि सुरक्षित वाहतूक
न्यू मंगलोर बंदराने 14 मार्च ते 31 मार्च या कालावधीत कच्च्या तेलाच्या आणि LPG च्या खेपांवरील मालवाहतूक शुल्क माफ केले आहे. यामुळे आयातीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. याशिवाय, 'जग लाडकी' हे भारतीय टँकर मुंद्रा बंदरात यशस्वीपणे पोहोचले असून, मार्चच्या सुरुवातीला 'एमटी शिवालिक' आणि 'एमटी नंदा देवी' या जहाजांनी सुमारे 92,712 मेट्रिक टन LPG घेऊन होर्मूझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली आहे.