ICC Rankings: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आयसीसीच्या नव्या एकदिवसीय क्रमवारीत धमाकेदार कामगिरीसह अव्वल स्थानाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत केलेल्या प्रभावी खेळींचा त्याला थेट फायदा झाला असून, कोहलीने दोन स्थानांची मोठी झेप घेत क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. या झेपेमुळे सध्याचा अव्वल खेळाडू रोहित शर्मासमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे.
रोहित पहिल्या स्थानी कायम, कोहली अवघ्या काही रेटिंगने मागे
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या ODI क्रमवारीत रोहित शर्माने 782 रेटिंगसह अव्वल स्थान कायम राखले आहे. तर विराट कोहली 773 रेटिंगसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दोघांमधील रेटिंगचा फरक अत्यंत कमी असल्यामुळे आगामी सामन्यांत रोहितने मोठी खेळी करण्याची गरज स्पष्टपणे जाणवत आहे.
हेही वाचा – Naseem Shah Viral Video: 'चहा प्यायला चला…'; पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहाचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल
इतर भारतीयांची स्थिती कायम
कोहलीच्या कामगिरीमुळे न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान यांना प्रत्येकी एक स्थान गमवावे लागले. मिशेल 766 रेटिंगसह तिसऱ्या स्थानी, तर झद्रान 764 रेटिंगसह चौथ्या स्थानी घसरला आहे. भारताचा शुभमन गिल पाचव्या स्थानावर कायम असून पाकिस्तानचा बाबर आझमही सहाव्या स्थानी स्थिर आहे. भारतीय फलंदाजांमध्ये श्रेयस अय्यर एका स्थानाने घसरून दहाव्या स्थानावर पोहोचला आहे, तर श्रीलंकेचा चरिथ असलंका नवव्या स्थानावर टॉप-10 मध्ये दाखल झाला आहे.
पुढील मालिका जानेवारीत; क्रमवारीत फेरबदलाची शक्यता
दरम्यान, टीम इंडिया यावर्षी आणखी एकही एकदिवसीय सामना खेळणार नसल्याने भारतीय खेळाडूंच्या रँकिंगमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र जानेवारीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसतील आणि त्यानंतर क्रमवारीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आगामी मालिकेत दोन्ही दिग्गजांमध्ये होणाऱ्या रँकिंग स्पर्धेची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.