ICC Fines Bangladesh Cricket Team: बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान यजमान बांगलादेश संघाला आयसीसीच्या (ICC) दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 6 गडी राखून शानदार विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली असली, तरी या आनंदावर विरजण पडले आहे. निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंच्या 'मॅच फी'मधून 10 टक्के रक्कम कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
'स्लो ओव्हर रेट'मुळे मॅच फीमध्ये 10 टक्क्यांची कपात
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा संघ गोलंदाजी करताना निर्धारित वेळेपेक्षा 2 षटके मागे असल्याचे आढळून आले. आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.22 नुसार, वेळेत पूर्ण न झालेल्या प्रत्येक षटकामागे खेळाडूंना त्यांच्या मानधनाच्या 5 टक्के दंड आकारला जातो. बांगलादेश दोन षटके मागे असल्याने एकूण 10 टक्के दंड लागू करण्यात आला आहे. कर्णधार मेहदी हसन मिराज याने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यासमोर आपली चूक कबूल केल्याने या प्रकरणी पुढील सुनावणी टाळण्यात आली आहे.
चट्टोग्राममध्ये होणार मालिकेचा निर्णायक फैसला
ही तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सध्या अत्यंत चुरशीच्या वळणावर आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 26 धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने जोरदार पुनरागमन केले. आता मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 23 एप्रिल रोजी चट्टोग्राम येथे खेळला जाणार आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने बांगलादेशसाठी ही मालिका जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – IPL 2026 | IPL 2026 मध्ये कोणत्या संघात किती महाराष्ट्राचे खेळाडू ? 'या' एका संघात एकही मराठमोळा खेळाडू नाही
टी-20 मालिकेचे बिगुल 27 एप्रिलपासून वाजणार
एकदिवसीय मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 27 एप्रिल रोजी खेळला जाईल. विश्वचषक पात्रतेच्या शर्यतीत राहण्यासाठी बांगलादेशला आता केवळ मैदानातील कामगिरीवरच नाही, तर षटकांच्या गतीवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. शिस्तीच्या बाबतीत झालेली ही चूक संघाच्या खिशाला कात्री लावणारी ठरली असली, तरी अंतिम सामन्यात मालिका विजयासाठी बांगलादेश सज्ज झाला आहे.