Crime News : गुजरात राज्यातील जामनगर शहरातून गुन्हेगारी जगताला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने अत्यंत भयंकर कट रचला. पती जिग्नेश याला मद्यातून विषारी सायनाइड पाजून त्याची हत्या करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून एका बंद कारखान्यात तब्बल 12 ते 15 फूट खोल खड्डा खणून मृतदेह पुरण्यात आला.
या भयानक गुन्ह्यानंतर आरोपी पत्नीने दोन वर्षे सासरच्या लोकांची दिशाभूल केली. पती कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेला असून तेथील कंपनीच्या नियमांमुळे त्याचा संपर्क होऊ शकत नाही, असा खोटा प्रचार ती करत राहिली. सलग दोन वर्षे सासरचे लोक या बनावावर विश्वास ठेवून मुलाच्या परतण्याची वाट पाहत होते.
परंतु, या संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण तेव्हा मिळाले जेव्हा जिग्नेशचा भाऊ स्वतः ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी सज्ज झाला. त्याने वहिनीकडे भावाच्या कंपनीचा पत्ता मागितला, जेणेकरून तो तिथे जाऊन भेट घेऊ शकेल. पत्ता देण्यास टाळाटाळ करणाऱ्या वहिनीच्या वर्तनावर संशय आल्यामुळे दीराने पोलिसांत जाण्याचा दम भरला. पोलिसांच्या भीतीने तिचे अवसान गळाले आणि तिने दोन वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याचा संपूर्ण कट कबूल केला.
हेही वाचा – Melghat: मेळघाट हादरलं! 15 दिवसांच्या चिमुकलीच्या पोटावर 12 चटके; उपचारांच्या नावाखाली अघोरी प्रकार
पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत घटनास्थळी खोदकाम करून 15 फूट खोल गाडलेले सांगाड्याचे अवशेष बाहेर काढले आहेत. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराविरुद्ध हत्येचा आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.