Pappu Yadav Attack: पूर्णियाचे अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. अयोध्येतील राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराबाबत आपल्यावर दाखल झालेल्या FIR वर स्पष्टीकरण देत असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने घोषणाबाजी करत गदारोळ सुरू केला. पप्पू यादव यांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात झटापट झाली. संबंधित व्यक्तीने बूट फेकून मारल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पप्पू यादव यांनी केला आहे.
याप्रसंगी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, त्या व्यक्तीकडे धारदार चाकू होता आणि तो त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच आला होता. "मी अशा धमक्यांना आणि कट-कारस्थानांना अजिबात घाबरत नाही. जर कोणाला माझी हत्या करायची असेल तर त्यांनी ती करून पाहावी," असे आव्हानच त्यांनी या घटनेनंतर दिले.
राम मंदिराच्या पथनाट्यावरून वाद आणि जीवे मारण्याच्या धमक्या
या गोंधळाच्या काही वेळ आधीच पप्पू यादव यांनी एका गंभीर धोक्याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले होते. अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीतील कथित घोटाळ्यावर भाष्य करणाऱ्या एका पथनाट्यात त्यांनी साधूचा वेश परिधान करून सहभाग घेतला होता. या पथनाट्यात इतरही विरोधी पक्षांचे नेते सामील होते. या प्रकारामुळे भाजप, विविध हिंदू संघटना आणि साधू-संतांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला असून, याप्रकरणी वाराणसीमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हे पथनाट्य सादर केल्यापासून आपल्याला सातत्याने शिवीगाळ केली जात असून जिवंत जाळून मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा दावा खासदारांनी केला. तसेच, आपली हत्या करणाऱ्यासाठी रीतसर बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वकिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप: सुरक्षेत मोठी त्रुटी
या घटनेनंतर पप्पू यादव यांच्या वकिलांनी दिल्ली पोलिसांच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. सुरक्षेची पूर्ण हमी देऊनही घटनास्थळी केवळ 3 ते 4 पोलीस कर्मचारी तैनात होते. गेल्या 2 दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही योग्य ती सुरक्षा पुरवण्यात आली नाही.
माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर आणि गर्दीत थेट चाकू घेऊन माणूस आत कसा पोहोचू शकतो, असा सवाल उपस्थित करत 6 वेळा खासदार राहिलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेत झालेली ही चूक म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि पोलिसांचे संगनमत असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.