Bomb Threat in Kerala : केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या अधिकृत निवासस्थानासह आणि पाल्यम येथील एका खासगी बँकेत बॉम्ब (Bomb Threat) ठेवल्याची धमकी सोमवारी (1 डिसेंबर) मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. या धमकीनंतर तातडीने तपासणी करण्यात आली असता, बॉम्ब असल्याच्या बातम्या बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे निष्पन्न झाले.
मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना (Private Secretary) धमकीचा ईमेल (E-mail) मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या 'क्लिफ हाऊस' (Cliff House) या निवासस्थानी तात्काळ शोध मोहीम (Search Operation) सुरू करण्यात आली, अशी माहिती केरळ पोलिसांनी दिली. या तपासणीच्या कामात बॉम्ब शोधक पथकांनाही (Bomb Squad) पाचारण करण्यात आले होते. नंतर तपासणीत हा ईमेल बनावट असल्याची पुष्टी झाली.
हेही वाचा – Pinarayi Vijayan: FEMA उल्लंघन प्रकरणात CM पिनराई विजयन अडचणीत; KIIFB वर 466 कोटींचा गंभीर आरोप
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बॉम्ब असल्याच्या बनावट ईमेल धमक्या यापूर्वीही अनेक वेळा प्राप्त झाल्या आहेत. या सर्व ईमेल्समध्ये तमिळनाडूतील (Tamil Nadu) राजकीय घडामोडी (Political Developments) आणि तेथील प्रलंबित प्रकरणांचा उल्लेख केलेला होता. पोलिसांनी सांगितल्यानुसार, हे ईमेल्स डार्क वेब ॲप्लिकेशन (Dark Web Application) वापरून पाठवले गेले आहेत, ज्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांना कठीण झाले आहे.
या धमक्या बनावट ठरल्या असल्या तरी, खबरदारीचा उपाय म्हणून अशा ईमेल्सची (E-mails) प्रत्येक वेळी कसून तपासणी केली जाते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पिनरयी विजयन सध्या परदेश दौऱ्यावर (Foreign Trip) असून, ते रविवारपासून 3 दिवसांच्या दुबई (P. Vijayan Dubai Visit) दौऱ्यावर आहेत.