Crime News: आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका 19 वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला निर्घृणपणे संपवलं. मुलाच्या कल्याणासाठी आशीर्वाद घेण्याचा बहाणा करून हसिनीने पती रमेश (वय 23) याला मल्लाप्पा कोंडा टेकड्यांवरील श्री मल्लेश्वर स्वामी मंदिरात नेले आणि तिथेच त्याला संपवलं. मृत रमेश हा मूळचा तामिळनाडूचा रहिवासी असून तो होसूरमधील एका खाजगी कंपनीत काम करत होता. दरम्यान, हसिनीचे 2 वर्षांपूर्वी रमेशशी लग्न झाले तेव्हा ती अल्पवयीन होती, असा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला असून पोलीस या बालविवाह कायद्याच्या उल्लंघनाच्या कोनातूनही तपास करत आहेत. या दाम्पत्याला एक लहान मुलगी देखील आहे.
बालपणीच्या मित्राशी गुपित प्रेमसंबंध अन् कट
वरवर पाहता रमेश आणि हसिनी यांचे कौटुंबिक जीवन सामान्य वाटत असले, तरी पोलीस तपासात हसिनीचे तिच्या बालपणीच्या मित्राशी, म्हणजेच 20 वर्षीय युगंधरशी गुपित प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे. रमेशला रस्त्यातून कायमचे हटवण्यासाठी या दोघांनी मिळून एक भयानक कट रचला. कौटुंबिक तीर्थयात्रेचा बहाणा करून हसिनीने रमेशला डोंगरावरील मंदिरात चालण्यासाठी राजी केले. रमेश जेव्हा मोटारसायकलवरून जात होता, तेव्हा हसिनी मोबाईलवरून तिचे 'रिअल-टाइम लोकेशन' गुपचूप प्रियकर युगंधरला पाठवत होती. या माहितीच्या आधारे युगंधर आणि त्याच्या साथीदारांनी डोंगराळ रस्त्यावरील 3 ऱ्या तीव्र वळणाजवळ आधीच सापळा रचला.
हँडबॅग रस्त्यावर फेकली अन् जंगलात 100 मीटर धावून केला गेम
ठरलेल्या कटानुसार, त्या तीव्र वळणावर पोहोचताच हसिनीने तिची हँडबॅग चालत्या गाडीवरून रस्त्यावर फेकली. रमेश बॅग उचलण्यासाठी खाली उतरला असता, दबा धरून बसलेला युगंधर आणि त्याचे साथीदार अंधारातून बाहेर आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रमेशने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जवळच्या जंगलात सुमारे 100 मीटरपर्यंत पळ काढला, परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्रांनी त्याचा निर्घृण खून केला. ही संपूर्ण थरारक घटना रमेशच्या लहान मुलीसमोर घडली. त्या रात्री उशिरापर्यंत कुटुंब परत न आल्यामुळे चिंतेत असलेल्या हसिनीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली, ज्यानंतर या गुन्ह्याचा छडा लागला.
हेही वाचा – Nanded Teacher News : नांदेडमध्ये शिक्षकाने 2 मुलांसह संपवलं जीवन, व्हॉट्अॅप स्टेट्सनं खळबळ
सीसीटीव्ही फुटेज आणि जीपीएस ट्रॅकिंगमुळे हसिनीचा पर्दाफाश
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये सुरुवातीला रमेश कुटुंबासह जाताना दिसला, मात्र काही वेळानंतरच्या फुटेजमध्ये हसिनी पतीला मागे सोडून इतर दोन अनोळखी पुरुषांसोबत मोटारसायकलवरून जाताना दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि जीपीएस (GPS) लोकेशन ट्रॅकिंगच्या मदतीने जंगलातून रमेशचा मृतदेह शोधून काढला. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपी हसिनी, तिचा प्रियकर युगंधर आणि त्यांच्या इतर 2 साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.