छत्रपती संभाजीनगरमधून एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शेताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या माजी सरपंचाच्या मुलाला एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करत संपवलं आहे. यामुळे संपुर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कन्नड तालुक्यातील जामडी येथील माजी सरपंच रामचंद्र पवार यांचा 45 वर्षीय मुलगा राजू पवार मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले.
त्यानंतर बराच वेळ गेला तरी राजू पवार घरात परतले नव्हते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी राजू पवार यांच्या मित्रांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राजू पवार यांचे कुटुंबीय अधिक काळजीत पडले. चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर राजू पवार यांच्या शेतालगत असलेल्या वन विभागाच्या गट क्रमांक 95 मधील जमिनीत राजू पवार यांचा मृतदेह सापडला.
एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर आणि कमरेखाली गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले. राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून, बुधवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, अद्याप आरोपीला शोधण्यात यश आले नाही. राजू पवार यांचे वडील रामचंद्र पवार हे पाच वर्षांपूर्वी सरपंच होते, त्यानंतर आता त्यांच्या काकू रेणुका पवार या सरपंचपदावर आहेत. दरम्यान घडलेल्या घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर संपुर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.