Mumbai Mayor Bomb Threat: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर पुन्हा एकदा धमकीचा संदेश प्राप्त झाल्याने प्रशासनात तीव्र खळबळ उडाली आहे. या ई-मेलद्वारे केवळ महापौर कार्यालयालाच नव्हे, तर शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई मेट्रो, शाळा आणि मुंबई शेअर बाजार यांसारख्या गर्दीच्या व महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनापूर्वी हा घातपात घडवून आणण्याचा स्पष्ट उल्लेख यात करण्यात आला असून, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचे आणि नागरिकांनी मेट्रोने प्रवास टाळण्याचे आवाहन या संदेशातून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या धमकीच्या ई-मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणांचा वापर करण्यात आला असून काही व्यक्तींच्या नावांचाही समावेश असल्याने या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात येत आहे.
हेही वाचा – Pune Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून हिंजवडीत रक्तरंजित थरार! तरुणाची हत्या, तरुणीवरही जीवघेणा हल्ला
सायबर पोलिसांचा तपास आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क
महापौरांना यापूर्वीही 2 वेळा अशा स्वरूपाचे धमकीचे संदेश प्राप्त झाले होते, त्यामुळे लागोपाठ आलेला हा 3 रा ई-मेल प्रशासकीय वर्तुळात चिंतेची बाब ठरत आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली असून परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सदर ई-मेल कोणत्या IP अॅड्रेसवरून पाठवण्यात आला आहे, त्याचा मूळ स्रोत काय आहे आणि यामागे कोणत्या असामाजिक घटकांचा हात आहे, याचा तांत्रिक शोध घेण्यात येत आहे.