Assam Violence : आसाममध्ये हिंसाचार! भाजप नेत्याचे घर पेटवले; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर, नेमकं काय घडलं?

डोंकामुकाम येथील भाजप नेते तुलिराम रोंगहांग यांच्या घराला आंदोलकांनी लक्ष्य केले. संतप्त जमावाने घराला आगच लावली आणि मोठ्या प्रमाणात दगडफेकही केली. यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

Assam Violence : आसाममध्ये हिंसाचार! भाजप नेत्याचे घर पेटवले; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर, नेमकं काय घडलं?

Assam BJP Leader House set on Fire : आसाममधील वेस्ट कार्बी आंगलाँग जिल्ह्यात सोमवारी जमिनीवरून सुरू असलेल्या एका जुन्या वादाने हिंसक वळण घेतले. संतप्त आंदोलकांनी भाजप नेते आणि कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषदेचे (KAAC) मुख्य कार्यकारी सदस्य तुलिराम रोंगहांग यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

नेत्याच्या घरावर हल्ला आणि दगडफेक
डोंकामुकाम येथील भाजप नेते तुलिराम रोंगहांग यांच्या वडिलोपार्जित घराला आंदोलकांनी लक्ष्य केले. संतप्त जमावाने केवळ घराला आगच लावली नाही, तर मोठ्या प्रमाणावर दगडफेकही केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला, ज्यामध्ये किमान 3 जण जखमी झाले आहेत. सध्या या भागात शांतता राखण्यासाठी CRPF, पोलीस कमांडो आणि अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असून प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

उपोषण आणि गैरसमजातून भडकली हिंसा
या हिंसेचे मूळ मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणात आहे. पेलांगपी परिसरात नऊ जण आरक्षित जमिनींवरील अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणाला बसले होते. सोमवारी पोलिसांनी या आंदोलकांची प्रकृती खालावल्याच्या कारणास्तव त्यांना उपचारासाठी गुवाहाटीला हलवले. मात्र, स्थानिक नागरिकांनी याला अटक समजले आणि त्यातूनच संतापाचा उद्रेक झाला. तुलिराम रोंगहांग यांनी स्पष्ट केले की, ही केवळ एक 'गैरसमजूत' होती आणि कोणालाही अटक करण्यात आली नव्हती, तर केवळ उपचारासाठी नेले होते.

हेही वाचा – Delhi Protest: दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू तरुणाच्या हत्येचा निषेध; बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर जोरदार आंदोलन

PGR आणि VGR जमिनींचा काय आहे वाद?
कार्बी आंगलाँग हा आदिवासी बहुल जिल्हा असून तो संविधानाच्या सहाव्या अनुसूचीच्या कक्षेत येतो. येथील 'प्रोफेशनल ग्रेझिंग रिझर्व्ह' (PGR) आणि 'व्हिलेज ग्रेझिंग रिझर्व्ह' (VGR) या जमिनी केवळ चराईसाठी आरक्षित आहेत. या जमिनींवर बिगर-आदिवासी लोकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक संघटना अनेक दिवसांपासून त्यांच्या हकालपट्टीची मागणी करत आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये रोंगहांग यांनी हे अतिक्रमण हटवण्याची घोषणा केली होती, परंतु सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न
डोंकामुकाममधील हिंसेनंतर खरोनी भागातही तणाव पसरला. काही समाजकंटकांनी बिहारी आणि नेपाळी समुदायांसारख्या अल्पसंख्याक गटांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यावर दगडफेक झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रोंगहांग यांनी आवाहन केले आहे की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे सध्या कोणतीही बेदखलीची कारवाई करणे कायद्याचे उल्लंघन ठरेल, त्यामुळे हा प्रश्न चर्चेनेच सोडवला पाहिजे. सध्या पोलीस या भागात फ्लॅग मार्च काढत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

शांततेचे आवाहन आणि न्यायालयीन प्रक्रिया
तुलिराम रोंगहांग यांनी आंदोलकांना दिफू येथे चर्चेसाठी बोलावले होते आणि संमेलनात बैठकही ठरली होती. "आम्हाला उपोषणाबाबत कोणतीही अडचण नाही, मात्र आरोग्य बिघडल्याने त्यांना हलवणे गरजेचे होते," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्याने सरकार किंवा परिषद थेट कारवाई करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या हिंसेमुळे आदिवासी आणि बिगर-आदिवासी यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा – Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीला जाताय? मग हे नियम नक्की वाचा, कार्ड मिळाल्यावर 'इतक्या' वेळात सुरू करावी लागेल यात्रा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number