Dowry Harassment Case : एका 28 वर्षीय नवविवाहित तरुणीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. आकृती सुतार असे मृत तरुणीचे नाव असून, 8 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर 24 एप्रिल रोजी तिचा विवाह झाला होता. एका खासगी कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या आकृतीचा मृतदेह तिच्या पुष्प विहार येथील घरापासून सुमारे 10 किमी अंतरावर असलेल्या लोधी कॉलनीतील पालिका कुंज येथील एका निवासी सोसायटीमध्ये सापडला. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास ती इमारतीवरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी तिच्या कुटुंबीयांनी मात्र ही आत्महत्या नसून हुंड्यासाठी केलेली हत्या असल्याचा थेट आरोप केला आहे.
हत्येच्या काही तासांपूर्वीच दिली होती ऑफिसमधील मित्रांना पार्टी
धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी ही घटना दिल्लीत उघडकीस आली आहे. आकृतीच्या कुटुंबीयांनी आत्महत्येची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. मृत्यू झाला त्या शनिवारी आकृती केवळ ऑफिसलाच गेली नव्हती, तर नवीन नोकरी जॉईन केल्याच्या आनंदात तिने सहकाऱ्यांसाठी एका छोट्या पार्टीचेही आयोजन केले होते. इतकेच नव्हे तर, संध्याकाळी 6 च्या सुमारास तिने आपल्या आईशी फोनवर अगदी नेहमीप्रमाणे संवाद साधला होता. या संभाषणात तिने पार्टी खूप छान झाल्याचे सांगत आपण आता घरी घेण्यासाठी निघाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे जी मुलगी काही तासांपूर्वी अत्यंत आनंदी होती आणि जिने स्वतः पार्टी दिली, ती अचानक असे पाऊल उचलूच शकत नाही, असा युक्तिवाद करत हा नैराश्याचा प्रकार नसल्याचे तिच्या पालकांनी म्हटले आहे.
बेपत्ता झाल्याचा फोन आणि त्यानंतर दीड तासात मृतदेह सापडल्याची माहिती
या घटनेच्या संपूर्ण घटनाक्रमाबाबत माहिती देताना आकृतीच्या काकांनी सांगितले की, संध्याकाळी आईशी बोलणे झाल्यानंतर अवघ्या दोनच तासांत, म्हणजेच रात्री 8 च्या सुमारास आकृतीच्या पतीने तिच्या कुटुंबाला फोन केला. आकृती अजून घरी पोहोचली नसून ती बेपत्ता झाल्याचे त्याने सांगितले. या फोननंतर अवघ्या 90 मिनिटांनी, म्हणजेच साधारण रात्री 9.30 वाजता पोलिसांकडून कुटुंबाला एका महिलेचा मृतदेह आढळल्याचा फोन आला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तो मृतदेह आकृतीचाच असल्याचे स्पष्ट झाले.
बेरोजगार पतीकडून 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सातत्याने छळ
आकृतीचा 24 वर्षीय भाऊ अमेय सुतार याने सांगितले की, त्याची बहीण मानसिकदृष्ट्या अत्यंत खंबीर होती आणि ती कधीही स्वतःचा जीव घेऊ शकत नाही. आकृतीचा पती अरास्तू सिक्का हा सध्या बेरोजगार असून, लग्नानंतर तो आणि त्याचे नातेवाईक आकृतीकडे 20 लाख रुपयांची मागणी करत होते, असा आरोप कुटुंबाने केला आहे. या हुंड्यासाठी तिचा सातत्याने छळ केला जात होता आणि तिला धमक्याही दिल्या जात होत्या. अरास्तूने तिला यापूर्वी अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि तिच्या मृत्यूच्या अवघ्या 2 दिवस आधीच त्यांच्यात यावरून खूप मोठे भांडण झाले होते, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू; हुंड्याशी संबंधित कलमांनुसार चौकशी होणार
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, मृत तरुणीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कौटुंबिक छळ, हुंड्याची मागणी आणि हत्येचा संशय या सर्व बाजू लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत. लग्नाला केवळ 2 महिने झाले असल्याने या प्रकरणात हुंडाबळीच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली जात असून आरोपी पती आणि त्याच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Goregaon Rain Accident : मुंबईत पावसामुळे आणखी एक बळी! प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कारभाराची पोलखोल