Crime News: उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. भांकरपूर बसेला गावात एका सुनेने आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूला संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे, ही कृत्य केल्यानंतर नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचून मृतदेहाचा दफनविधीही उरकण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे सुनेचा आणि तिच्या प्रियकराचा खरा चेहरा समोर आला आहे.
प्रियकरासोबत पकडल्यानंतर रचला कट
पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनेचे शेजारी राहणाऱ्या आदिल नावाच्या तरुणाशी अवैध संबंध होते. 3 मार्चच्या रात्री जेव्हा आदिल तिला भेटण्यासाठी घरी आला होता, तेव्हा तिची सासू अचानक जागी झाली. सासूने दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत रंगेहात पकडले आणि या प्रकाराला जोरदार विरोध केला. आपले बिंग फुटेल आणि समाजात बदनामी होईल, या भीतीने सून आणि प्रियकर आदिल यांनी सासूचा गळा आणि तोंड उशाने दाबले. श्वास गुदमरल्याने सासूचा जागीच मृत्यू झाला.
हृदयविकाराचा झटका आल्याचं नाटक आणि दफनविधी
खून लपवण्यासाठी सुनेने अत्यंत धूर्तपणे पावले उचलली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिने आपल्या पतीला फोन करून सांगितले की, सासूला 'सायलेंट हार्ट अटॅक' आला आहे. कुटुंबाने तिच्यावर विश्वास ठेवला आणि कोणताही संशय न घेता मृतदेहाचा दफनविधी उरकून मृतदेह पुरला. मात्र, सासर्यांना पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्यूबाबत संशय आला आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
कबरीतून बाहेर काढला मृतदेह; 'असं' उघड झालं गुपित
एसएसपी मथुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या (DM) आदेशानंतर पोलिसांनी कबर खोदून मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिलेचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाने सुनेचा 'हार्ट अटॅक'चा दावा पूर्णपणे खोडून काढला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सून आणि तिचा प्रियकर आदिल या दोघांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे.