NASSCOM Advisory: पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय संकटामुळे जागतिक आयटी उद्योगासमोर सायबर धोक्यांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर, आयटी क्षेत्रातील प्रमुख संस्था 'नासकॉम'ने (NASSCOM) सोमवारी सर्व सदस्य कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या व्यवसाय ऑपरेशन्स स्थिर असली, तरी अनिश्चिततेच्या या वातावरणात सायबर हल्ले आणि तांत्रिक व्यत्यय येण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे कंपन्यांनी आपली ऑपरेशनल तयारी आणि सायबर सुरक्षा पायाभूत सुविधा अधिक मजबूत कराव्यात, असा सल्ला नासकॉमने दिला आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर सायबर धोक्यांची टांगती तलवार
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाला आहे. या संघर्षाचा परिणाम केवळ हवाई क्षेत्रावरच नाही, तर जागतिक तंत्रज्ञान पायाभूत सुविधांवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे प्रादेशिक स्थिरता धोक्यात आली असून, जागतिक सागरी व्यापार आणि सायबर सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. "वेगाने बदलणाऱ्या भू-राजकीय घडामोडी लक्षात घेता, कंपन्यांनी त्यांच्या व्यवसाय सातत्य (Business Continuity)आणि सायबर सुरक्षा आराखड्याबाबत अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे," असे नासकॉमने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
डेटा सेंटर्ससाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना
नासकॉमने आयटी कंपन्यांना त्यांच्या 'बिझनेस कंटिन्यूटी प्लॅन्स' (BCPs) सक्रिय करण्याचे आवाहन केले आहे. सेवांमध्ये कोणताही खंड पडू नये आणि महत्त्वपूर्ण डेटा सुरक्षित राहावा यासाठी 'क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर' आणि 'डेटा सेंटर्स'साठी पर्यायी व्यवस्था विचारात घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. संकटकाळात तांत्रिक बिघाड झाल्यास कामात अडथळा येऊ नये, यासाठी ही पूर्वतयारी महत्त्वाची ठरणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
प्रभावित क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही नासकॉमने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जमिनीवरील परिस्थितीचे सतत निरीक्षण करून कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) सुविधा देण्यास प्राधान्य देण्याचे सुचवण्यात आले आहे. परिस्थिती बदलत असताना उद्भवणाऱ्या कोणत्याही संभाव्य अडथळ्यांना तोंड देण्यासाठी कंपन्या सध्या त्यांच्या आकस्मिक योजनांचा सक्रियपणे आढावा घेत आहेत.