Middle East Crisis: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने आता जागतिक युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीची (Strait of Hormuz) पूर्णपणे नाकेबंदी करण्याची घोषणा केल्यानंतर चीनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. "आमच्या अंतर्गत आणि व्यापारी बाबींमध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये," अशा स्पष्ट शब्दांत चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे. इस्लामाबादमध्ये पार पडलेली 21 तासांची प्रदीर्घ बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज, 13 एप्रिलपासून अमेरिकेने ही नाकेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनचे संरक्षणमंत्री आक्रमक; व्यापारावर गदा न आणण्याचे आवाहन
चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, चीन मध्यपूर्वेतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. "आमची जहाजे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून सातत्याने ये-जा करत असतात. इराणसोबत आमचे ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रातील महत्त्वाचे करार आहेत आणि आम्ही ते पाळणारच. या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण असून ती आमच्यासाठी खुली आहे," असे सांगत त्यांनी अमेरिकेच्या नाकेबंदीला न जुमानण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, चीन इराणला 'दुहेरी वापराचे तंत्रज्ञान' आणि शस्त्रपुरवठा करत असल्याचे आरोप चीनचे परराष्ट्र प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची 'ट्रुथ सोशल'वरून युद्धघोषणा
इस्लामाबादमधील चर्चा फिस्कटल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नेहमीच्या शैलीत 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत इराणला इशारा दिला. "इराणला आता बेकायदेशीर खंडणी उकळता येणार नाही. अमेरिकन नौसेना हॉर्मुझ सामुद्रधुनीत येणाऱ्या-जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला रोखण्यासाठी आणि ताब्यात घेण्यासाठी सज्ज आहे," असे ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ज्या जहाजांनी इराणला 'टोल' (शुल्क) भरले असेल, त्यांना आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात रोखले जाईल आणि त्यांना सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही.
सामुद्रधुनीतील 'सुरुंग' नष्ट करणार; इराणच्या अस्तित्वाला धोका?
ट्रम्प यांनी केवळ नाकेबंदीच नाही, तर लष्करी कारवाईचेही संकेत दिले आहेत. "इराणने या भागात पेरलेले समुद्री सुरुंग (Mines) आम्ही नष्ट करण्यास सुरुवात करू. जर कोणत्याही इराणी सैनिकाने आमच्यावर किंवा शांततापूर्ण जहाजावर गोळीबार केला, तर त्यांचा पूर्णपणे सफाया केला जाईल," असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या मते, ही नाकेबंदी लवकरच सुरू होईल आणि त्यात इतर राष्ट्रेही सहभागी होतील. इराणचे उरले-सुरले अस्तित्व नेस्तनाबूत करण्याची धमकीही त्यांनी यावेळी दिली आहे.
हॉर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व आणि जागतिक परिणाम
हॉर्मुझ सामुद्रधुनी ही जागतिक खनिज तेल पुरवठ्याची जीवनवाहिनी मानली जाते. जगातील एकूण तेल व्यापाराचा मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो. अमेरिकेच्या या नाकेबंदीमुळे आणि चीनच्या प्रत्युत्तरामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. या दोन महासत्तांमधील वाद आता प्रत्यक्ष लष्करी संघर्षात रूपांतरित होतो की काय, या भीतीने संपूर्ण जगाचे लक्ष मध्यपूर्वेकडे लागले आहे.