Cyber Crime: देशात सायबर गुन्हेगारांचे जाळे वेगाने पसरत असून आता उच्चशिक्षित आणि वृद्ध नागरिक त्यांच्या निशाण्यावर आहेत. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका 71 वर्षीय निवृत्त अभियंत्याला शेअर बाजारात भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 75 लाख रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी आधी विश्वास संपादन केला आणि नंतर गुंतवणुकीच्या नावाखाली आयुष्यभराची पुंजी लंपास केली. याप्रकरणी रविवारी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपवरून टाकलं जाळं
पोलिस उपायुक्त (सायबर गुन्हे) शैव्या गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आलोक सहदेव हे सेक्टर-104 मधील 'ATS वन हॅम्लेट सोसायटी'मध्ये राहतात. 25 फेब्रुवारी रोजी त्यांना 'Wealth Alliance' नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. या ग्रुपमध्ये शेअर बाजार आणि आयपीओ (IPO) मधून मोठ्या नफ्याचे दावे केले जात होते. ग्रुपमधील इतर सदस्य सातत्याने त्यांच्या नफ्याचे 'स्क्रीनशॉट्स' शेअर करत असल्याने सहदेव यांचा या ग्रुपवर विश्वास बसला. याच विश्वासाचा फायदा घेत आरोपींनी त्यांना एका बनावट 'ट्रेडिंग ॲप्लिकेशन'द्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
आधी नफा दाखवला, मग मोठी रक्कम उकळली
सायबर गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीनुसार, त्यांनी सहदेव यांना सुरुवातीला लहान रक्कम गुंतवण्यास सांगितले. त्यावर त्यांना 8,000 रुपयांचा नफाही मिळवून दिला, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर आरोपींनी त्यांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले. सहदेव यांनी हळूहळू विविध बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांना शेअर्सचे जास्त वाटप झाले असून पैसे न भरल्यास खाते गोठवले जाईल, अशी भीतीही आरोपींकडून घालण्यात आली. अशा प्रकारे त्यांच्याकडून एकूण 75.64 लाख रुपये उकळण्यात आले.
नफा गायब आणि खाते 'ब्लॉक'
जेव्हा सहदेव यांनी अधिक पैसे देण्यास नकार दिला आणि आपली मूळ रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी त्यांचे ट्रेडिंग ॲप खाते ब्लॉक केले. तसेच त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमधूनही काढून टाकण्यात आले. विशेष म्हणजे, ॲपवर दिसणारा सर्व नफा एका क्षणात नाहीसा झाला, तेव्हा आपल्याला लुटले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. 75 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सायबर सेलचा तपास आणि सतर्कतेचे आवाहन
या तक्रारीनंतर सायबर गुन्हे शाखेने तातडीने तपास चक्रावून ज्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले होते, त्यांचा शोध सुरू केला आहे. संशयास्पद खात्यांमधील व्यवहार गोठवण्याची (फ्रीज) प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात व्हॉट्सॲप ग्रुपवरील गुंतवणुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका, तसेच कोणत्याही अनधिकृत ॲपद्वारे पैसे गुंतवू नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती तात्काळ '1930' या हेल्पलाइन क्रमांकावर देण्याचे सूचित करण्यात आले आहे.