Satish Maratha Case : गुजरात राज्यातील सूरत शहराला हादरवून सोडणाऱ्या सतीश मराठा मृत्यू प्रकरणात एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नव्याने हाती आलेल्या प्रत्यक्षदर्शी पुराव्यांमुळे या घटनेची भीषणता अधिकच स्पष्ट झाली आहे. टोळीयुद्धाच्या आणि वर्चस्वाच्या वादातून घडलेल्या या भीषण हत्याकांडाचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गुन्हेगारांनी पूर्ण तयारीनिशी सापळा रचून सतीशवर तलवार, कुऱ्हाड आणि चाकूंनी तब्बल 39 वार करत त्याला जागेवरच संपवलं.
इंच न् इंच रेकी करून रचला मृत्यूचा सापळा
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास सतीश आपल्या महिला मैत्रिणीसोबत कारने प्रवास करत होता. भीस्तान भागातील भीमनगर परिसरात गाडी पोहोचताच आधीच टपून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर झेप घेतली. दुचाकीवरून आलेल्या अल्पवयीन मुलांनी क्षणाचाही विलंब न लावता कारची काच फोडून सतीशला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. तो बचाव करण्यासाठी बाहेर पडताच, झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या इतर सहकाऱ्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले आणि धारदार शस्त्रांचा वारंवार वर्षाव केला.
तुरुंगात असलेल्या कुख्यात गुंडाशी जुना वाद
या प्रकरणाच्या मुळाशी जुने वैमनस्य आणि स्थानिक दारूच्या धंद्यातील वर्चस्वाची स्पर्धा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या कारागृहात असलेल्या राहुल मंडल या गुंडाशी सतीशची जुनी दुष्मनी होती. यापूर्वी गोधरा उड्डाणपुलाजवळ सतीशच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याला संपवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. या वेळी मात्र पूर्ण नियोजन करून हा गुन्हा घडवून आणला गेला. घटनेनंतर महाराष्ट्राच्या दिशेने पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या मुख्य आरोपींसह एकूण नऊ जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. यात चार अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.