T20 World Cup 2026: भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 8 मार्च रोजी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत 2026 चा टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला. या ऐतिहासिक विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघासाठी आपली तिजोरी उघडली असून, 100 कोटींहून अधिक मोठ्या बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.
विजेत्या संघाला मिळणार 131 कोटींचे बक्षीस
आयसीसीकडून मिळणाऱ्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त, बीसीसीआयने स्वतंत्रपणे टीम इंडियासाठी 131 कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव देबाजित सैकिया यांनी ही माहिती अधिकृतपणे दिली. 2026 च्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक म्हणून हे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
भारताने राखले विजेतेपद
या विजयाचे महत्त्व विषद करताना देबाजित सैकिया म्हणाले की, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने केवळ विजय मिळवला नाही, तर एक नवा इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा राखणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. तसेच, 3 वेळा टी-20 विश्वचषक जिंकून भारताने या फॉरमॅटमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.
? News ? BCCI announces a cash reward of INR 131 crore for #TeamIndia following their triumphant campaign in the ICC Men’s T20 World Cup 2026. ? Details | #T20WorldCup | #MenInBlue https://t.co/eagTz1eOUb — BCCI (@BCCI) March 10, 2026
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा दारूण पराभव
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत केवळ 1 सामना गमावला. अंतिम सामन्यात भारताने फलंदाजीमध्ये तुफानी कामगिरी करत 250 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ पत्त्यासारखा कोसळला आणि भारताने 96 धावांनी मोठा विजय मिळवला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बीसीसीआयने खेळाडू, निवड समिती आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.