Asha Bhosle Death: दिग्गज गायिका आशा भोसले यांचे पार्थिव आज त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेणाऱ्या आशा ताईंना निरोप देताना संपूर्ण परिसरात निस्तब्धता पसरली आहे. 11 एप्रिल रोजी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र 12 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी नेले जात असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, कडेकोट पोलीस बंदोबस्तात रुग्णवाहिकेसोबत अनेक गाड्यांचा ताफा पाहायला मिळाला.
अंतिम दर्शन आणि अंत्यसंस्काराचे नियोजन
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या दुःखद वृत्ताला अधिकृत दुजोरा दिल्यानंतर प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशा ताईंचे पार्थिव सोमवार, 13 एप्रिल रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी 4:00 वाजता दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निवासस्थानी सध्या सिनेसृष्टीतील मान्यवरांची रांग लागली असून, सई मांजरेकर आणि सलीम मर्चंट यांसारख्या कलाकारांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले आहे.
आठ दशकांचा सुवर्णप्रवास आणि अजरामर गाणी
आशा भोसले यांच्या जाण्याने केवळ एक गायिका नाही, तर भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’ पासून ते ‘दिल चीज क्या है’ सारख्या गझलपर्यंत त्यांनी दिलेली अजरामर गीते आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. शास्त्रीय संगीत, गझल, कॅबरे आणि पॉप अशा सर्वच प्रकारांत त्यांनी आपली हुकूमत गाजवली. पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित या गायिकेने आपल्या आवाजाने जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे.
Ambulance carrying #AshaBhosle's mortal remains reaches her residence. #FilmfareLens pic.twitter.com/Dz8eqbC3d3 — Filmfare (@filmfare) April 12, 2026
गिनीज बुकमधील विक्रम आणि अष्टपैलू गायकी
आशा ताईंनी स्वतःला केवळ हिंदी किंवा मराठी गाण्यांपुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी तमिळ, बंगाली, मल्याळमसह रशियन आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये आपली कला सादर केली. 20 हून अधिक भाषांमध्ये 11,000 हून अधिक गाणी गायल्याबद्दल 2011 मध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने त्यांना सन्मानित केले होते. काही दाव्यांनुसार त्यांच्या नावावर 12,000 हून अधिक गाण्यांचे रेकॉर्डिंग आहे. त्यांचा हा अफाट वारसा येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी संगीताची शाळा म्हणून ओळखला जाईल.