नैराश्य की ऑनलाईन गेमिंग? सुवर्णपदक विजेत्या 24 वर्षीय इंजिनिअरचा दुर्दैवी अंत; तरुणाच्या वडिलांनी थेटच सांगितलं..

मृत आनंद कुमार हा अभ्यासात अत्यंत हुशार होता आणि त्याचे शैक्षणिक रेकॉर्ड चांगले होते. त्यामुळे या घटनेमुळे त्याच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

नैराश्य की ऑनलाईन गेमिंग? सुवर्णपदक विजेत्या 24 वर्षीय इंजिनिअरचा दुर्दैवी अंत; तरुणाच्या वडिलांनी थेटच सांगितलं..

Anand Kumar Kanpur Gold Medalist Engineer Death : एका गोल्ड मेडलिस्ट इंजिनीअर तरुणाने स्वतःला संपवल्याची बाब उघडकीस आली आहे. 24 वर्षीय तरुण आनंद कुमार याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आपले आयुष्य संपवले आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात ही हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली. आनंदचे कुटुंब काही कामासाठी बिहारला गेले असताना तो काही कारणास्तव कानपूरमध्येच थांबला होता. शुक्रवारी सकाळी घरकाम करणारी महिला आली असता, वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिने बिहारमधील त्याच्या कुटुंबीयांना फोन केला आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडला असता आनंद खोलीत मृतावस्थेत आढळला.

राज्यपालांच्या हस्ते मिळाले होते सुवर्णपदक
आत्महत्या केलेला आनंद कुमार हा अभ्यासात अत्यंत हुशार होता आणि त्याचे शैक्षणिक रेकॉर्ड चांगले होते. काही वर्षांपासून तो कानपूरच्या गोविंद नगर भागात वास्तव्यास होता. तो मूळचा बिहारमधील बक्सर जिल्ह्याचा रहिवासी होता. सुमारे 2 वर्षांपूर्वी एका नामांकित महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करत त्याने राज्यातील विद्यापीठांमध्ये 3 रा क्रमांक पटकावला होता. या यशाबद्दल त्याला उत्तर प्रदेशच्या राज्यपालांच्या हस्ते प्रतिष्ठित सुवर्णपदक (Gold Medal) देऊन गौरविण्यात आले होते. बी.टेक. (B.Tech) पूर्ण केल्यानंतर त्याने कानपूरमधील एका खासगी कंपनीत आपली अप्रेंटिसशिपही यशस्वीपणे पूर्ण केली होती आणि या काळातही त्याचा पुढील शिक्षणाचा व परीक्षांचा प्रवास सुरू होता.

खोलीत आढळली चिठ्ठी; सरकारी नोकरी न मिळण्याचे दडपण
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना आनंदच्या खोलीची झडती घेताना एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. या चिठ्ठीत त्याने आपल्या माता-पित्यांची माफी मागत लिहिले आहे की, अनेक वेळा प्रामाणिक प्रयत्न करूनही त्याला त्याचे ध्येय साध्य करता आले नाही, ज्यामुळे तो हे टोकाचे पाऊल उचलत आहे. तसेच आपल्या मृत्यूसाठी कोणालाही दोषी धरू नये, असेही त्याने नमूद केले आहे. कानपूरचे पोलीस उपायुक्त दीपेंद्र नाथ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदचे मोठे भाऊ अमित कुमार आणि बहीण प्रिया हे दोघेही बिहारमध्ये सरकारी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याप्रमाणे आपल्याला सरकारी नोकरी मिळवता येत नसल्याच्या नैराश्यातून तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा – Pune Crime: पुणे हादरलं! मैत्रीचा गैरफायदा घेत महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर सामूहिक अत्याचार; चौघांना अटक

वडिलांचा ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाचा दावा
दरम्यान, या प्रकरणाला वेगळा फाटा देत आनंदचे वडील राजकुमार गुप्ता यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. केवळ स्पर्धा परीक्षेत अपयश येणे किंवा सरकारी नोकरी न मिळणे हे त्यांच्या मुलाच्या आत्महत्येचे मुख्य कारण असू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आनंदला ऑनलाईन गेम्स खेळण्याचे अत्यंत भयानक व्यसन जडले होते, असा थेट दावा गुप्ता यांनी केला आहे. मात्र, या व्यसनाबद्दल किंवा त्यामध्ये झालेल्या पैशांच्या व्यवहाराबाबत त्यांनी सध्या अधिक सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे.

तपास सुरू; मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन
या घटनेनंतर कानपूर पोलिसांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करत आनंदचा मृतदेह पोस्ट-मॉर्टेमसाठी (Post-Mortem) पाठवला होता. तपास प्रक्रियेनंतर त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बक्सर येथील त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांचे अपयश की ऑनलाईन गेमिंगचे व्यसन, या दोन्ही बाजूंनी पोलीस आता तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईलच्या तपासाद्वारे या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – Kalyan Crime: हत्या करून मृतदेह बाथरूममध्ये ठेवला, 24 तास नळ सुरू… पण एका व्हॉइस नोटनं उघड केलं सगळं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number