UAE President India Visit : भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील घनिष्ठ संबंधांची प्रचिती आज पुन्हा एकदा देशाला आली. UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे सोमवारी संध्याकाळी भारतात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. विशेष म्हणजे, अल नाहयान हे केवळ 2 तासांच्या धावत्या भेटीसाठी भारतात आले.
‘माझ्या भावाचे स्वागत…’ : पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी विमानतळावरील स्वागताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना अल नाहयान यांचा उल्लेख ‘माझे भाऊ’ असा केला. “भारत आणि UAE यांच्यातील अतुट मैत्रीला ते किती महत्त्व देतात, हे त्यांच्या या भेटीवरून स्पष्ट होते. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे,” अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी अरबी भाषेतही पोस्ट लिहून या भेटीचे महत्त्व अधोरेखित केले.
हेही वाचा – Greenland Crisis: ट्रम्पचा ग्रीनलँड डाव, युरोपवर टॅरिफची तलवार; मात्र भारताला होणार मोठा फायदा, जाणून घ्या
व्यापार आणि ऊर्जेच्या दृष्टीने महत्त्वाची भेट
अध्यक्ष झाल्यानंतर मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचा हा तिसरा भारत दौरा आहे. अवघ्या दोन तासांची ही भेट असली तरी ती धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत मोलाची मानली जात आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सध्या 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या आणि एलपीजीच्या गरजांसाठी प्रामुख्याने युएईवर अवलंबून आहे.
Went to the airport to welcome my brother, His Highness Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, President of the UAE. His visit illustrates the importance he attaches to a strong India-UAE friendship. Looking forward to our discussions.@MohamedBinZayed pic.twitter.com/Os3FRvVrBc — Narendra Modi (@narendramodi) January 19, 2026
दरम्यान, मध्य पूर्वेतील सध्याची अस्थिर परिस्थिती पाहता दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा जागतिक राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरेल. विमानतळावर औपचारिक स्वागत झाल्यानंतर दोन्ही नेते थेट बैठकीच्या ठिकाणी रवाना झाले. ही संक्षिप्त पण महत्त्वपूर्ण चर्चा आटोपून अल नाहयान आज रात्रीच स्वदेशी परतणार आहेत.