अहमदाबाद : अनेक लोकांना घरात कुत्रा किंवा मांजर पाळण्याचा शौक असतो. हे प्राणी कुटुंबाचा अविभाज्य भाग बनतात. हल्ली हे प्रमाण खूप वाढले आहे. वेगवेगळ्या देशी-परदेशी जातीची कुत्री-मांजरे अनेकांच्या घरात विराजमान झाली आहेत. मात्र, अशाच एका हौशी व्यक्तीवर कुणावरवरही ओढवू नये, अशा प्रसंग ओढवला. आपल्या याच लाडक्या पाळीव प्राण्यासोबतच्या एका किरकोळ घटनेत घडलेल्या छोट्याशा चुकीमुळे अहमदाबादमधील एका पोलीस निरीक्षकाला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
पोलीस निरीक्षक वनराज मांजरीया यांचा त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या नखांमुळे झालेल्या जखमेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू झाला. या जखमेकडे विशेष लक्ष न दिल्यामुळे मांजरीया यांना काही काळानंतर रेबीज झाला. याची लक्षणे दिसू लागल्यानंतर ही बाब समोर आली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी सुरुवातीला या लहानशा जखमेकडे दुर्लक्ष केले, ज्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली. या घटनेमुळे संपूर्ण अहमदाबाद पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा – Karnataka HC On X Handle : कर्नाटक उच्च न्यायालयाचा 'एक्स'ला झटका; 'भारतात काम करायचे असेल तर…'
नेमके काय घडले?
वनराज मांजरीया हे अहमदाबाद शहरात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी ते आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळत असताना, त्यांना कुत्र्याचे नख लागले आणि एक किरकोळ जखम झाली. ही जखम साधी आहे असे समजून मांजरीया यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि वेळेवर उपचार घेतले नाहीत.
कालांतराने त्यांना रेबीजची लक्षणे दिसू लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मांजरीया यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण पोलीस दल हादरले आहे.
या घटनेतून धडा घेणं महत्त्वाचं
या दुर्घटनेनंतर पशुपालकांनी आणि नागरिकांनी काही गोष्टी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. रेबीज हा जरी एक असाध्य रोग असला, तरी योग्य वेळी लसीकरण आणि उपचार घेतल्यास तो टाळता येऊ शकतो. मात्र, उपचार वेळेवर घेण्यात हयगय करणे प्राणघातक ठरते.
पाळीव प्राण्यांसोबत खेळताना किंवा त्यांच्या संपर्कात असताना कोणत्याही प्रकारची किरकोळ जखम, ओरखडा किंवा चावल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि रेबीजचे लसीकरण करणे हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या घटनेमुळे पाळीव प्राण्यांशी संबंधित आरोग्याच्या धोक्यांबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज यातून स्पष्ट झाली आहे.