Pune Poisonous Liquor Case: पुणे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील 21 जणांच्या प्राणाला मुकण्यास कारणीभूत ठरलेल्या बेकायदेशीर दारू माफियांविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. हडपसर, फुगेवाडी आणि दापोडी भागात मिथॅनॉलयुक्त विषारी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांच्या थेट आदेशावरून ही धडक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.
दत्ता लोंढेसह 9 जणांवर 'मकोका' अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणात टोळीचा सूत्रधार दत्ता ऊर्फ भाऊ भिवराव लोंढे (रा. उरुळी कांचन) याच्यासह त्याच्या इतर 8 सहकाऱ्यांवर मकोका कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींमध्ये आकाश जाधव, योगेश व्हनकडे, राधेशाम प्रजापती, कल्पेश अग्रवाल, आर्यन धोत्रे यांच्यासह नवी मुंबईतील अभिषेक, अरुण आणि अंकित चौबे या चौबे बंधूंचा समावेश आहे. सुरुवातीला हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा तपास गांभीर्य ओळखून सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान, या टोळीने उरुळी कांचन येथून जाळे पसरवत अत्यंत घातक रसायनांचा वापर करून दारूची निर्मिती व विक्री केल्याचे आणि त्यातून बेकायदेशीर संपत्ती कमावल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर कारवाईवर शिक्कामोर्तब
दरम्यान, CID चे पोलीस उपअधीक्षक शामराव काळे यांनी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मध्यस्थीने विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे मकोका कारवाईचा सविस्तर प्रस्ताव पाठवला होता. प्रकरणी गोळा केलेले तांत्रिक व प्रत्यक्ष पुरावे तपासल्यानंतर अतिरिक्त महासंचालकांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. या कडक कारवाईमुळे पुण्यातील अवैध धंदेवाले आणि गुन्हेगारी टोळ्यांमध्ये तीव्र घबराट पसरली आहे.