Noida Shocker : ग्रेटर नोएडा वेस्ट येथील गौर सिटी सोसायटीमध्ये एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घराच्या 8 व्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 22 डिसेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेतील शिक्षकांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
नेमकी घटना काय?
बिसरख पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौर सिटी (चौथा अव्हेन्यू) येथे राहणारी कनिष्क ही दहावीत शिकत होती. 22 डिसेंबरच्या पहाटे 2 ते 3 वाजेच्या सुमारास तिने टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
मोबाईलवरून झाला होता वाद
मृताचे वडील रवी रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी कनिष्कने अनवधानाने आपला मोबाईल फोन शाळेत नेला होता. ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिला वर्गात कठोरपणे फटकारले आणि तिचा मानसिक छळ केला. शाळेतील या अपमानस्पद वागणुकीमुळे कनिष्क प्रचंड मानसिक तणावाखाली होती. घरी परतल्यानंतर ती कोणाशीही बोलली नाही आणि नैराश्यातून तिने जीवन संपवल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.
हेही वाचा – Nagpur News : नागपूर हादरलं! 6 ते 8 महिन्यांच्या चिमुकलीला आईच्या कुशीतून उचललं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
शाळा प्रशासनाने फेटाळला आरोप
दुसरीकडे, शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शाळेच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थिनी मोबाईल फोन वापरत होती. कोणत्याही विद्यार्थ्याला मानसिक त्रास दिला जात नाही, कुटुंबाचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिले आहे.
पोलीस तपास सुरू
दरम्यान, बिसरख पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेतली असून तपास चक्रावून फिरवली आहेत. पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून संबंधित शिक्षकांची चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक अहवालात शैक्षणिक दबावाचा उल्लेख असला, तरी आता शाळा आणि कुटुंब यांच्यातील आरोपांमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.