Digital Arrest Scam : मुंबईमध्ये एक धक्कादायक सायबर गुन्हा समोर आला आहे. डिजिटल अटक (Digital Arrest) या बनावट संकल्पनेचा वापर करून फसवणूक करणाऱ्यांनी 80 वर्षीय महिलेला तब्बल 1.08 कोटींचा गंडा घातला. स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणविणाऱ्या एका महिलेने आणि तिच्या साथीदारांनी हा संपूर्ण कट रचला. सेंट्रल सायबर सेलने गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून, नागपूरमधील एका खात्यातील 35 लाखांची रक्कम गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे.
फसवणुकीची सुरुवात कशी झाली?
पीडित महिलेला 27 ऑक्टोबर रोजी एक फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख विजय खन्ना नावाच्या अधिकाऱ्याप्रमाणे करून दिली आणि सांगितले की तिचे आधार कार्ड मनी-लाँड्रिंगमध्ये वापरले गेले आहे. तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला जाईल, अशी धमकीही देण्यात आली. यानंतर कॉल एका महिलेकडे ट्रान्सफर करण्यात आला. तिने स्वतःला IPS रश्मी शुक्ला म्हटले आणि तेथूनच हा डिजिटल अरेस्टचा कट सुरू झाला.
फसवणूक करणाऱ्यांनी पीडितेला सांगितले की, तिला डिजिटल अरेस्ट करण्यात आली आहे. तिला तपासात सहकार्य करावे लागेल. त्यांना बनावट अटक वॉरंट देखील पाठवण्यात आले होते, ज्याच्या आधारे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सतत दबाव आणला जात होता. महिलांना धमकी देण्यात आली की, जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांना ताबडतोब अटक केली जाईल. सततच्या मानसिक दबावामुळे आणि धमक्यांमुळे पीडितेने विविध खात्यांमध्ये 1.08 कोटी ट्रान्सफर केले.
हेही वाचा – Crime News : तिच्या हट्टापायी गेला मुलांचाही जीव; नवऱ्यानं पत्नीसह स्वतःच्याचं दोन्ही मुलांना संपवलं
बँक खाते रिकामे झाल्यावर कळलं वास्तव
काही दिवसांनी कॉल येणे बंद झाले. बँक खात्यात शिल्लक शून्य होती. तेव्हा पीडितेला कळाले की तिची मोठी फसवणूक झाली आहे. तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. तपासात असे दिसून आले की, नागपूरमधील हितेश महुसकर नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात ही मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. सध्या, पोलिसांनी त्याच्या खात्यातून 35 लाख गोठवले आहेत आणि आरोपीविरुद्ध बीएनएस आणि आयटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.